धुळे : भिक्षुकाच्या खून प्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना बेड्या

मारेकरी मोहाडीतील; धुळ्यात उलटसुलट चर्चांना पूर्णविराम

murder case of a beggar Father and son were Arrested
murder case of a beggar Father and son were Arrestedsakal

धुळे : शहरातील चाळीसगाव रोड पोलिस ठाणे हद्दीतील भिक्षुकाच्या निर्घृण खून प्रकरणी मोहाडी पोलिसांनी संशयित पिता-पुत्रासह तिघांना बेड्या ठोकल्या. मोहाडी पोलिसांच्या शोध पथकाला प्रभारी पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दहा हजारांचे रोख बक्षीस देत त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

मोहाडी परिसरातील उड्डाणपुलाखाली २० फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर ५० वर्षीय भिक्षुकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाला. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात पंकज चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्याचा समांतर तपास प्रभारी पोलिस अधीक्षक तथा अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड आणि मोहाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच शोध पथकातील कर्मचारी करत होते.

मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. शिंदे यांच्या नेतृत्वात श्याम काळे, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरु केला. खून झालेला वृद्ध भिक्षेतून उदरनिर्वाह करीत होता. त्याचे मोहाडीतील संजय पखाले याच्याशी दोन ते चार दिवसांपूर्वी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना समजली. नंतर पथकाने मोहाडीत तपास सुरू केला. त्या वेळी संशयित पखाले गुन्हा घडल्यापासून घरी नसल्याचे पुढे आले. पोलिस पथक पखालेच्या नातेवाइकांकडे विचारपूस करण्यासाठी पोचले. तेव्हा पखालेचा मुलगा प्रतीक पथकाला पाहून पळत होता. पोलिसांनी संशयित संजय पखाले, प्रतीक व साथीदार आकाश ऊर्फ गुरू जगन्नाथ बोरसे (सर्व रा. मोहाडी) या संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. मोहाडी पोलिसांनी संशयितांना चाळीसगाव रोड पोलिसांच्या स्वाधीन केले. पुरावा नसताना खुनाचा उलगडा करणाऱ्या‍ मोहाडी पोलिसांना अपर पोलिस अधीक्षक बच्छाव यांनी दहा हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले.

साधू नव्हे तर भिक्षुकच

मोहाडीतील उड्डाणपुलाखाली भिक्षुकाच्या खुनानंतर तो साधू होता की भिक्षुक यावर उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यात तो साधू असून त्याला अन्य गटाच्या संशयितांनी ठेचून मारल्याची अफवा शहरात होती. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर तो साधू नसून भिक्षुक होता व त्याचे मारेकरी अन्य गटाचे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जाते.

दारूचा अड्डा कुणाच्या आशीर्वादाने?

मोहाडीच्या उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणावर दारू पिणाऱ्यांची गर्दी असते. या ठिकाणी काही दारू विक्रीची दुकाने आहेत. त्यात दारूडे वादावादी करतात. त्यामुळे या भागातील शांतता भंग होते. पुलाखालील दारूचा अड्डा कुणाच्या आशीर्वादाने चालतो हा संशोधनाचा विषय आहे. या वादातूनच भिक्षुकाचा खून झाल्याचे मानले जाते. त्यामुळे पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणाचा बंदोबस्त करावा, अशी मोहाडीतून मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com