Latest Marathi News | युवकाचा गळा चिरून खून; चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon : युवकाचा गळा चिरून खून; चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : शहरातील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात अमृतसर येथील तरुणाचा गळा चिरुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या चार संशयित मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनमितसिंग गुरुप्रितसिंग (वय १९, रा. अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

गेल्या २६ ऑक्टोबरला मनमितसिंग गुरूपितसिंग यांच्यासोबत जसवंतसिंग, रामसिंग, बलजितसिंग, पंजाबसिंग (सर्व रा. अमृतसर) हे सर्व नांदेड दर्शनासाठी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने जनरल डब्यामधून प्रवास करीत होते.(Murder of youth by slitting his throat Case registered against four suspects Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon : ‘भारत जोडो’ त हजारो कार्यकर्ते जाणार

या वेळी डब्यातील इतर प्रवाशांसोबत त्यांचे भांडण झाले. या दरम्यान झालेल्या मारहाणीत मनमितसिंग गुरूपितसिंग याच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन मनमितसिंग याच्यावर धारदार शस्त्राचा वापर करीत गळा चिरून खून करण्यात आला व धावत्या रेल्वेमधून गुरुवारी (ता. २७) रेल्वे यार्डमधील खांबा क्रमांक ४४८/२ ते ४४८/४ दरम्यान अप रेल्वे लाईनमध्ये मृतदेह फेकण्यात आला.

या प्रकरणी मयताचा भाऊ डॉ. मनकिरत सिंग गुरूपितसिंग (रा. अमृतसर, पंजाब) याने दिलेल्या फिर्यादीनंतर चारही संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांनी संशयित जसवंतसिंग, रामसिंग, बलजितसिंग, पंजाबसिंग यांच्याविरुद्ध शनिवारी (ता. २९) गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजय घेरडे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon : अमळनेरात चोरट्यांची दिवाळी; दागिन्यांसह रोकड लंपास

डेबिट कार्डवरून पटली ओळख

मृत व्यक्तीजवळ डेबिट कार्ड होते. त्यावरून संबंधित बँकेशी संपर्क साधून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. शुक्रवारी सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

"या घटनेत घटनास्थळी कुठलेही साक्षीदार मिळाले नाही. कदाचित रेल्वेमध्ये प्रवास करीत असताना पत्रा लागल्याने मृत्यू झाला असावा किंवा खाली पडल्याने गळा चिरला गेला असावा, काहीही होऊ शकते. ही खुनाची घटना नाही."

भाऊसाहेब मगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक लोहमार्ग पोलिस ठाणे, भुसावळ

हेही वाचा: Jalgaon : यज्ञेशच्या उपचाराचा मार्ग मोकळा; पालकमंत्र्यांचा मदतीचा हात