या गावात यापुढे ‘थर्टीफस्ट’ नाहीच ! काय आहे कारण ? वाचा सविस्तर  

राजू कवडीवाले
Monday, 28 December 2020

ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीद्वारे गावात '३१ डिसेंबर' साजरे न करण्याविषयी ठराव पारित केला होता. तशीच अभिनंदनीय कृती यावर्षी निमगाव ग्रामस्थानी केली आहे.

यावल : अलीकडे ‘थर्टीफस्ट’ साजरा करण्याचे लोण गावखेड्यापर्यंत पोचले आहे. कर्कश आवाजात, मद्यप्राशन करून नृत्य करण्यात ग्रामीण तरुणाई देखील आता मागे नाही. मात्र, ही पाश्‍चिमात्य विकृती हद्दपार करण्याचा निर्धार निमगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे. 

आवश्य वाचा- विशेष उत्सव रेल्वे गाड्यांचा विस्तार; धावणार 20 गाड्या

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून निमगाव (ता. यावल) येथील धर्मप्रेमी ग्रामस्थांनी गावातून ‘थर्टीफस्ट’ची विकृती हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. 

समिती गेल्या १८ वर्षांपासून इंग्रजी नववर्षानिमित्त होणाऱ्या अपप्रकरांविरोधात जागृती करत आहे. समिती ही सेवाभावी संस्था असून, समिती राष्ट्ररक्षण, धर्मजागृती तसेच सार्वजनिक उत्सवांत होणारे अपप्रकार रोखणे, राष्ट्रध्वज तसेच देवतांची विटंबना थांबवणे अशा विविध विषयांमध्ये गेली १८ वर्षे जनजागृती करीत आहे. तसेच अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यांना साहाय्य करते. ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात मद्य आणि अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. तसेच रात्री मद्य पिऊन वाहने भरधाव वेगाने चालवणे, रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके वाजवून ध्वनिप्रदूषण करणे, अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, मुलींची छेड काढणे, विनयभंग, बलात्कार आदी कृत्य करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसतात.

आवश्य वाचा- पिल्लू विहिरीत पडल्याने मादी बिबट्याने फोडला मातृत्वाचा हंबरडा..आणि सुरू झाले रेस्क्यू !  

 

समितीतर्फे प्रवचनातून प्रबोधन
समितीच्या वतीने जिल्ह्यात चोपडा, जळगाव, भुसावळ, यावल, धरणगाव, एरंडोल येथे ऑनलाइन बैठका आणि प्रवचने घेऊन जागृती करण्यात आली. तसेच यावल, धरणगाव, पाळधी, अमळनेर, एरंडोल, चोपडा, सावदा, वरणगाव येथील पोलिस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मागील वर्षी खर्ची (ता. एरंडोल) येथील ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीद्वारे गावात '३१ डिसेंबर' साजरे न करण्याविषयी ठराव पारित केला होता. तशीच अभिनंदनीय कृती यावर्षी निमगाव ग्रामस्थानी केली आहे. अन्य गावातील हिंदूंनीही याचा आदर्श घेऊन पाश्चात्य संस्कृतीला हद्दपार करून हिंदू धर्मानुसार आचरण करण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी केले आहे. 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new year marathi news yawal welcome party not held village