पोलिसदलात ‘वाझे’ इफेक्ट; जळगाव जिल्ह्यात अवैधधंदे बंदचे लेखी फर्मान! 

रईस शेख  
Wednesday, 7 April 2021

जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलिस ठाण्यातील डीबी पथकांना प्रभारी अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यावर कारवाई केल्याचा अहवाल देण्याच्या सुचना दिल्या.

जळगाव ः ः देशभर महाराष्ट्र पोलिस दलाच्या नाचक्कीस कारणीभूत मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे व परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणाने गृहमंत्र्यांची विकेट गेल्यानंतर त्याचा ‘इफेक्ट’ गल्लीपर्यंत दिसत आहे. गुन्हे शाखेची नुकतीच बैठक होऊन पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना अवैधधंदे बंदचे लेखी फर्मान बजावले आहे. 
 

आवश्य वाचा- जळगाव जिल्‍ह्‍यासाठी कडक निर्बंध लागू; ३० एप्रिलपर्यंत काय असणार सुरू वाचा
 

नवनियुक्त गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी पदभार घेतला असून, राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठका सुरू आहेत. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी नुकतीच नाशिकसह, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हीसी घेऊन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 

बैठकांचे सत्र 
वरिष्ठांनी व्हीसी, फोन कॉल्सवर संबंधित एसपींना सूचना दिल्या आहेत. खालच्या पातळीवर आपल्यावर कारवाईची कुऱ्हाड पडू नये, म्हणून जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलिस ठाण्यातील डीबी पथकांना प्रभारी अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यावर कारवाई केल्याचा अहवाल सादर करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. 

एलसीबीची बैठक 
नव्या गृहमंत्र्यानी पदभार घेताच पैसा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिस अधीक्षकांची शाखा म्हणून ओळखली जाणारी व पूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र असणारी स्थानिक गुन्हे शाखाच सर्वांच्या रडारवर आहे. जळगाव एलसीबीची बंदद्वार बैठक होऊन येणाऱ्या त्सुनामीची कल्पना प्रत्येक तालुक्यातील बीट अंमलदाराला दिल्या आहेत. 

जळगावातील ‘ते’ प्रकरण 
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ज्या पद्धतीने सहकारी पोलिस अधिकाऱ्यांशी चॅट आणि फोन रेकॉर्डिंगगद्वारे झालेल्या संभाषणातून महिन्याला शंभर कोटी खंडणीचे प्रकरण समोर आणले. अगदी तसेच जळगाव जिल्‍हा पोलिस दलात (वर्ष-२०१६-१७ च्या काळात) तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी वरिष्ठांना गुन्हे शाखेमार्फत सोन्याचे नाणे दिवाळीचे गिफ्ट म्हणून देण्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police marathi news jalgaon police action order close illegal business