
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेची समीकरणे बदलतात काय, याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष आहे.
रावेर : येथील पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदी उर्वरित काळात कोणाला संधी द्यायची याबाबत विचारविनिमय करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या तालुका कोअर कमिटीची बैठक बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कक्षात झाली. ठरल्याप्रमाणे कविता कोळी यांना सभापतिपदाची आणि धनश्री सावळे यांना उपसभापतिपदाची संधी देण्याबाबत चर्चा झाली.
अंतिम अडीच वर्षांसाठी येथील पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवड करताना पक्षश्रेष्ठींनी भारतीय जनता पक्षाच्या जितू पाटील यांची पहिल्या सव्वा वर्षासाठी निवड केली होती. नंतरच्या उर्वरित सव्वा वर्षात कविता कोळी यांना संधी देण्याचे निश्चित केले होते, तर उपसभापतिपदी धनश्री सावळे यांनाही संधी मिळण्याची अपेक्षा आहे. ठरल्यानुसार फेब्रुवारी महिन्यात सभापती जितू पाटील यांच्या सभापतिपदाचा सव्वा वर्षाचा कालखंड संपत आहे. दरम्यान, येथील पंचायत समितीत बारापैकी आठ सदस्य भारतीय जनता पक्षाचे असून, या पक्षाचे निर्विवाद वर्चस्व पंचायत समितीवर आहे. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेची समीकरणे बदलतात काय, याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष आहे. भारतीय जनता पक्षाच्या आठ पंचायत समिती सदस्यांमध्ये श्री. खडसे यांचे नेतृत्व मानणारे काही सदस्य आहेत. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार सभापती, उपसभापती यांनी पदाचा राजीनामा दिल्यास उर्वरित काळात भारतीय जनता पक्षाला आपल्याच सदस्याला ही संधी देताना कोणी सदस्य फुटणार नाही याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा हातातील सत्ता भारतीय जनता पक्षाला घालवावी लागेल, अशी चर्चा आहे. सध्या तरी पक्षाचा एकही सदस्य फुटणार नाही, असे कोअर कमिटीच्या एका ज्येष्ठ सदस्याने ‘सकाळ’ला सांगितले. ठरल्यानुसार संधी देण्याचा काहींनी आग्रह धरला तर याचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविण्याचा प्रस्ताव काही सदस्यांनी मांडला.
मागासवर्गीय महिलेला संधी हवी : खडसे
याबाबत माजी मंत्री खडसे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की सभापती किंवा उपसभापतिपदी मागासवर्गीय महिलेला संधी मिळणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून फक्त मते मागायची आणि त्यांना संधी द्यायची नाही, हे योग्य नाही. मागासवर्गीय महिलेला संधी मिळाल्यास आपण समर्थन देऊ आणि योग्य वेळी निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.