
Rajya kabaddi Spardha : महिलांमध्ये पुणे, तर पुरुष गटातून नंदुरबार उपांत्य फेरीत
जळगाव : जळगावात सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी (kabaddi) स्पर्धेत महिला गटातून पुणे, तर पुरुष गटातून नंदुरबार संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील उपांत्य व अंतिम सामने मंगळवारी (ता. १४) खेळविले जाणार आहेत. त्यानंतर स्पर्धेचा समारोप होईल. (rajya kabaddi spardha Pune in womens category and Nandurbar in mens category in semifinals jalgaon news)
जळगाव येथील सागर पार्क मैदानावरील मॅटवर २१ व्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक स्पर्धा सुरू आहे. सोमवारी (ता. १३) सामन्यांमध्ये महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने नाशिकचा ५३-१९ असा सहज पराभव केला.
मध्यांतराला २३-१३ अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याच्या संघाने उत्तरार्धात अधिक जोशपूर्ण खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. आम्रपाली गलांडे, सायली केरीपाळे, पूजा शेलार यांचा चतुरस्त्र खेळ या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. नाशिकच्या पूर्णिमा शिंदे, पूजा कुमावत चमकल्या.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
नंदुरबारचा कोल्हापूरवर विजय
पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात नंदुरबारच्या संघाने कोल्हापूरच्या संघाला ४६-२५ असे नमवून आगेकूच केली. विश्रांतीला २९-१२ अशी आघाडी घेणाऱ्या नंदुरबारच्या संघाने उत्तरार्धात सावध खेळ करीत हा विजय साकारला. ओंकार गाडे, दादासाहेब आव्हाड, अभिजित गायकवाड, ऋषिकेश बनकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.
कोल्हापूरकडून ओमकार पाटील, निखिल बर्गे उत्तम खेळले. या सामन्यांपूर्वी झालेल्या सामन्यातून पुरुष गटातून मुंबई शहर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, नंदुरबार, नांदेडच्या संघांनी बाद फेरी गाठली, तर पुणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, नंदुरबार, पालघरच्या महिला संघांनी बाद फेरीत प्रवेश केला.