Latest Marathi News | सुख पेरावे लागते... संदेश देणारे ‘सुखाशी भांडतो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Scenes from the play 'Sukhashi Bhandto Mee'

Rajya Natya Spardha : सुख पेरावे लागते... संदेश देणारे ‘सुखाशी भांडतो’

जगाची झोकुनी दुःखे

सुखाशी भांडतो आम्ही

स्वतःच्या झाकुनी भेगा

मनुष्ये सांधतो आम्ही

झोकुनी धुंदी यशाची झिंगताना

मृगजळाचा माग काढत हिंडतो आम्ही

सुखांशी भांडतो आम्ही...

नाट्य स्पर्धेचे चतुर्थ पुष्प गुंफताना सुख म्हणजे काय? ते मिळविण्यासाठी किंवा त्याच्या हव्यासापोटी माणूस सारखा पळत असतो. मात्र, सुख वाळूसारखे असते. मूठ कितीही घट्ट आवळली तरी मुठीतील वाळू हळूहळू निसटून जाते. त्याप्रमाणे सुख असते. याचे प्रत्यंतर देणारा अभिराम भडकमकर लिखित व पंकज वागळे दिग्दर्शित ‘सुखांशी भांडतो आम्ही’ हा नाट्यप्रयोग मध्य प्रदेश कला अकादमीने सादर केला. (Rajya Natya Competition Drama Sukhashi Bhandto Jalgaon News)

एका डॉक्टरला स्वत:चा भूतकाळ जेव्हा मुलाच्या स्वरूपाने वर्तमानात उभा ठाकतो तेव्हा तो हतबल होतो. उपचारासाठी आलेला रुग्ण डॉक्टरला त्याचा भूतकाळ आठवण्यास सांगतो. अखेर सुखाच्या शोधार्थ असलेले डॉक्टर दांपत्य भानावर येते. सुखाशी भांडणाऱ्या कुटुंबाची कथा लेखकाने नाट्यातून मांडली आहे. या नाट्यीकरणाला तेवढेच साजेसे दिग्दर्शनाचे लेणे दिले ते दिग्दर्शक पंकज वागळे यांनी.

नियोजन व मेहनतीने उत्कृष्टरीत्या केलेले सादरीकरण प्रेक्षकांनाही भावले. नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा सर्व बाबतीत नाटक भावते. तांत्रिक अंगांमध्ये प्रमोद रिसबूड (प्रकाशयोजना), अरुपा गोखले (पार्श्वसंगीत), तर निकुंज जायस्वाल, पीयूष केंदूरकर, हरीश यादव, मनीष करकरे, यश जायस्वाल, जान्हवी वाईकर, प्रमोद चौधरी यांचे नेपथ्य. सामान्य माणूसही सुखाच्या शोधार्थ भटकत असतो.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

पिंपळगावसारख्या खेड्यातून स्वत:चे भविष्य घडविण्यासाठी आलेला डॉक्टर श्रीधर (अमोल श्रीखंडे) मुंबई शहरात स्थायिक होतो. पत्नी मीता (निवेदिता वागळे) व मुलगा अक्षय (अराध्य तागडे) यांच्यासमवेत सुखासीन आयुष्य जगत असतो. बालउद्यानाच्या जागेत स्वत:चे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा त्याचा ध्यास असतो. त्याच दरम्यान सदाशिव नाशिककर (पंकज वागळे) हा मनोरुग्ण डॉ. श्रीधर यांच्याकडे उपचारासाठी येतो. पेशाने शिक्षक असलेला सदाशिव मनाला मारताना स्वतःची पत्नी व मुलाचा खून करतो.

पुस्तकातील तत्त्वज्ञान पुस्तकातच ठेवायचे असते, हे न उमगल्याने सदाशिवचे आयुष्य दुभंगते. व्यावहारिक जगाशी जुळवून घेणे न जमल्याने सदाशिव आपली अशी अवस्था झाल्याचे सांगताना कबूल करतो. सदाशिवबरोबर बोलताना डॉक्टरलाही अंतर्मनाचा आवाज ऐकू येऊ लागतो. आपल्या हातूनही चूक झाल्याचे तो कबूल करतो. डॉक्टरांकडे कामाला असलेल्या कमलाबाई (कविता गोखले) निवडक प्रसंगातून आपल्या वाचिक अभिनयातून छाप पाडून जातात, तसेच डॉक्टरांची पेशंट मिसेस प्रधान (सीमा गर्गे) यांची भूमिका प्रसंगानुरूप साजेशी.

‘सुख उगविण्यासाठी सुख पेरावे लागते’ हा नाटकातून मिळणारा संदेश नक्कीच उपयुक्त आहे. नाटकामध्ये डॉ. श्रीधर व मीता आपल्या मुलावर अन्याय होऊ नये, यासाठी दुसऱ्या मुलांबाबत गर्भपाताचा निर्णय घेतात. यासाठी दिग्दर्शकांनी वापरलेली फ्लॅशबॅक संकल्पना उत्कृष्ट ठरली. व्यावहारिक जगाशी जुळवून घेताना होणारी दमछाक डॉक्टरांनी उत्कृष्ट मांडली. कलाकारांनी आपल्या भूमिका सादर करताना घेतलेली मेहनत दिसून आली. या नाटकाच्या सादरीकरणाने जळगाव केंद्रावरील सादर होणाऱ्या नाटकांना आता एक नवे आव्हान उभे ठाकले आहे.

संयत अभिनयाने नटलेला, दिग्दर्शकीय कौशल्याने साकारलेला आणि तंत्रज्ञानाच्या साथीने सादर झालेला हा भावणारा नाट्यप्रयोग सादर केल्याबद्दल मध्य प्रदेश कला अकादमीच्या कलावंत व तंत्रज्ञानांचे मनःपूर्वक अभिनंदन!