Latest Marathi News | तळमजला Parking नसलेल्या इमारतींना अभय; महापालिका कारवाई करण्यास असमर्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News : तळमजला Parking नसलेल्या इमारतींना अभय; महापालिका कारवाई करण्यास असमर्थ

जळगाव : तळमजल्यावर पार्किंग नसलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी बांधलेल्या दुकांनाचे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईपर्यंत प्रक्रिया आली होती. मात्र, त्याला स्थगिती देण्यात आली होती. आता यापुढे या इमारतींवर कारवाईच होणार नसल्याने या इमारतीना ‘अभय’ देण्यात आले आहे.

शहरातील खासगी व्यापारी संकुलाच्या इमारतीसमोर रस्त्यावरच वाहने लावण्यात येतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होत आहे. अनेकवेळा वाहतूक विभागाने रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे.(Refuge for building ground floor parking Unable to take municipal action Jalgaon News)

हेही वाचा: State Transport Corporation : बनावट प्रमाणपत्रांमुळे वाहक त्रस्त

त्यामुळे जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील खासगी व्यापारी संकुलाला पार्किंगची सुविधा करण्याबाबत अट आहे. मात्र, ती अंमलात आणली जात नसल्याबाबतही नागरिकांच्या तक्रारी होत्या. या संकुलात पार्किंग असूनही त्याचा वापर का होत नाही, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. महापालिकेने यावर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली होती.

महापालिकेने केले सर्वेक्षण

नागरिकांच्या पार्किंगबाबत तक्रारी येत असल्यामुळे महापालिकेने शहरातील खासगी व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावरील पार्किंगचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेहरू चौक ते घाणेकर चौक मार्गावरील खासगी व्यापारी संकुलाचे सर्वेक्षण करण्याचा आदेशही देण्यात आला. त्यावरून नगररचना विभागाने स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती करून त्याचे सर्वेक्षणही केले आहे.

इमारतींना नोटीस व कारवाई

तळमजल्यावर पार्किंग सुविधा दाखवून त्या ठिकाणी दुकाने काढल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यानुसार याच मार्गावरील २७ इमारतींना नोटीस देण्यात आली. त्यापैकी दोन संकुलधारकांनी कोणतीच माहिती दिली नाही, तर २५ संकुलधारक सुनावणीसाठी उपस्थित राहिले. त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी सांगितल्यानुसार त्यांना पुन्हा पाहणीची संधी देण्यात आली. मात्र, दोन व्यापारी संकुलातील तळमजल्यावरील दुकाने निष्कासित करण्याची कारवाई करण्याबाबत सकारण आदेश बजावून नोटीस देण्यात आली, इतर २५ संकुलधारकांवर हीच कारवाई करण्यात येणार होती.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Jalgaon News : ग्रामपंचायत दस्तऐवजात बेकायदेशीर फेरबदल

स्थगिती, कारवाईस असमर्थतता

नगररचना विभागाने कारवाईचे आदेश दिल्यानंतरही महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी तळमजल्यावरील दुकाने तोडण्यास ‘तोंडी’ स्थगिती दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांनीही ही कारवाई थांबविली. विशेष म्हणजे कारवाई थाबंविण्याचे ‘लेखी’ आदेश कोणतेच नाहीत, तरीही कारवाई थांबविण्यात आली. याबाबत महापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी ‘चुप्पी’ साधली आहे.

पी १, पी २ पार्किंगचा पर्याय

आता याही पुढे जाऊन ही व्यापारी संकुलातील तळमजल्यावरील पार्किंगच्या जागेवरील दुकानांवर कारवाई करण्यास सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी असमर्थता दाखविली आहे. त्यांच्या पार्किंगवर कारवाई न करता आता शहरात सम-विषम तारखांना पी १ व पी २, अशी पार्किंग सुविधा करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे आता शहरातील व्यापारी संकुलाच्या इमारतीत पार्किंग जागेवर दुकाने काढण्याची अलिखित परवानगीच देण्यात आल्याचे दिसत आहे. महापालिकेत आता पदाधिकारी व अधिकारीच संगनमताने नियम धाब्यावर बसवित असताना, जनतेला मात्र नियम पाळण्याचे डोस दिले जात आहेत.

हेही वाचा: Jalgaon Sand Mining : अवैध वाळूचे Dumpar,Tracktor जप्त