esakal | जळगाव राष्ट्रवादीत ‘राजीनामा’नाट्य
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon

जळगाव राष्ट्रवादीत ‘राजीनामा’नाट्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव महानगरमध्ये अंतर्गत घमासान सुरू झाले आहे. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या राजीनाम्यानंतर महानगरातील १२ फ्रंटल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येऊन खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपला राजीनामा अचानक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविल्याने खळबळ उडाली होती.

वरिष्ठांकडून सूचना

याबाबत अधिक माहिती घेतली असता, पाटील यांची पक्षाने प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. एका व्यक्तीकडे दोन पदे ठेवता येत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा हे प्रदेशकडून सूचित करण्यात येत होते. त्यांना महानगर अध्यक्ष पदावर ठेवावे अशी मागणीही काही नेत्याकडून करण्यात आली.

हेही वाचा: हतनूरचे ४१ दरवाजे उघडले;८२ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

अखेर राजीनामा

मात्र, त्याबाबत वरिष्ठ नेत्याकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने अखेर पाटील यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच स्थानिक नेत्यांच्या तक्रारीमुळे आपल्याला काम करता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

बारा फ्रंटलवर पडसाद

त्यांच्या राजीनाम्यानंतर शुक्रवारी पक्षाच्या बारा फ्रंटल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, सामाजिक न्याय अध्यक्ष जितेंद्र चांगरे, पदवीधर अध्यक्ष अनिल पाटील, सचिव ॲड. कृणाल पवार, युवक कार्यअध्यक्ष अक्षय वंजारी, युवती अध्यक्ष आरोही नेवे, वक्ता सेलचे अध्यक्ष रमेश भोळे, सांस्कृतिक सेल अध्यक्ष गौरव लवंगरे, ओबीसी सेल अध्यक्ष कौशल काकर, शिक्षक आघाडी अध्यक्ष हेमंत सोनार यांचा समावेश आहे.

स्थानिक नेत्यांच्या तक्रारी

महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपण विधानसभा निवडणुकीपासून शहरात चांगले काम करीत आहोत. आपले काय चुकले हे न सांगता आपली प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. काम करणाऱ्या व्यक्तीबाबत स्थानिक काही नेत्यांच्या तक्रारीवरून असे होत असेल तर हे चुकीचे आहे. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे.

loading image
go to top