Jalgaon Crime News : पित्याच्या अंत्यसंस्कारला गोळीबाराचा नाद अंगलट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : पित्याच्या अंत्यसंस्कारला गोळीबाराचा नाद अंगलट

जळगाव : वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी हवेत गोळीबार करणे एका निवृत्त पोलिस (Police) निरीक्षकाला महागात पडले.

वडिलांचे परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार करताना बॅरलमध्ये गोळी अडकून अंतयात्रेत सहभागी पोलिस कर्मचाऱ्याच्या वडिलांची हत्या झाली होती. (retired inspector fined with rigorous imprisonment for firing at fathers funeral jalgaon crime news)

धरणगाव पोलिसांत दाखल गुन्ह्यात जिल्हा न्यायालयात दोषारोप सिद्ध होऊन निवृत्त पोलिस निरीक्षकास दोन वर्ष सश्रम कारावासासह द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. विठ्ठल श्रावण मोहकर असे शिक्षा झालेल्या निवृत्त पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. सोमवारी (ता. ६) जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. आर. पवार यांनी हा निकाल दिला.

पिंप्री (ता. धरणगाव) येथे निवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांच्या वडिलांचे ११ मे २०१९ ला निधन झाले होते. पिंप्री गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू असताना विठ्ठल मोहकर यांनी गावात रुबाब झाडण्याच्या उद्देशाने व पित्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या परवानाधारक बंदुकीतून हवेत दोनवेळा गोळीबार केला.

त्यानंतर विठ्ठल मोहकर यांचा मुलगा दीपक मोहकर याने विठ्ठल मोहकर यांच्याकडून रिव्हॉल्व्हर घेऊन तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदुकीच्या बॅरलमध्ये गोळी अडकली अन्‌ ती अंत्यसंस्काराला उपस्थित तुकाराम वना बडगुजर (वय ६५, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) यांच्या घशात शिरली. याबाबत मृत तुकाराम बडगुजर यांचे नातेवाईक राजू कृष्णा बडगुजर यांच्या तक्रारीवरून विठ्ठल मोहकर व त्यांचा मुलगा दीपक मोहकर यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

जळगाव जिल्हा न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुराव्याअंती न्यायाधीश पवार यांनी आरोपी विठ्ठल मोहकर यांना दोन वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये द्रव्य दंड व भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम ३० नुसार सहा महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावली.

गुन्ह्यातील दुसरा संशयित दीपक याची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हर्षवर्धन सपकाळे यांनी सहकार्य केले. मृत तुकाराम बडगुजर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गजानन बडगुजर यांचे वडील होत.