
Jalgaon News : महसूल विभागाची 42 कोटींची वसुली रखडली! संपामुळे अनेक फाईली अडकून
जळगाव : जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावी, या मागणीसाठी गेल्या १४ मार्चपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यात महसूल विभागाचे अकराशेवर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
मार्च महिना वर्षभरातील महसूल वसुलीचा असतो. जिल्ह्याची आतापर्यंत केवळ ४३ कोटींची वसुली बाकी आहे. मार्चअखेरीस केवळ दहा दिवस उरले आहेत. संप सुरू असल्याने ती वसुली होईल की नाही, असे चित्र आहे.
संपामुळे कोशागार विभागात तिनशेच्यावर बिलांच्या फाईल पडून आहेत. संपामुळे जिल्हा प्रशासनाचे महसूल वसुलीचे गणित कोलमडणार आहे. (Revenue Departments recovery of 42 crores stalled Many files stuck due to strike Jalgaon News)
१ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन महसूल वसूली पूर्ण करण्याचया सूचना दिल्या होत्या. पंतप्रधान ग्रामीण योजनेची प्रलंबित प्रकरणे त्वरित पूर्ण करा, गौणखजिन व जमीन महसूलबाबत दिलेले लक्षांक अधिकाऱ्यांना वेळेत पूर्ण करण्यास सांगितले होते.
मात्र, १४ पासून कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. यामुळे वसुली ठप्प झाली आहे. अधिकारी केवळ कार्यालयात आहेत. कर्मचारी संपावर आहेत.
मार्चअखेरची कामे कशी पूर्ण करावीत, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व संपकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तरी अजूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
जमीन महसूल लक्षांक व झालेली वसुली अशी
तालुका--लक्षांक--वसुली--टक्के
*बोदवड--१ कोटी ५० लाख --३२ लाख ४७ हजार--२१.६५ टक्के
*जळगाव--१९ कोटी ९० लाख--५ कोटी ५५ लाख--२७.९२
*भडगाव--२ कोटी--५३ लाख ८४ हजार--२६.९२
*चोपडा-- ४ कोटी ५० लाख--१ कोटी ५७ लाख--३४.९८
*अमळनेर--३ कोटी ५० लाख--१ कोटी २८ लाख--३६.६३
*पारोळा--२ कोटी २५ लाख--८२ लाख ८६ हजार--३६.८३
*धरणगाव--२ कोटी २५ लाख--९७ लाख २० हजार--४३.२०
*चाळीसगाव--७ कोटी--१ कोटी ६० लाख--२२.९६
*पाचोरा-- ४ कोटी--१ कोटी ९५ लाख--४८.९८
* मुक्ताईनगर--२ कोटी ६० लाख--१ कोटी ५४ लाख--५९.२६
*यावल-- ४ कोटी ५० लाख--१ कोटी ८२ लाख--४०.५२
*भुसावळ--५ कोटी ७५ लाख--१ कोटी ६९ लाख--२९.५४
*रावेर--४ कोटी ५० लाख--२ कोटी २४ लाख--४९.८७
*जामनेर-- ४ कोटी-- ४ कोटी ३ लाख--१००.६१
*एरंडोल--२ कोटी--१ कोटी २० लाख--६०.४८
*एकूण--७० कोटी २५ लाख--२७ कोटी १८ लाख--३८.६९ टक्के