Latest Marathi News | जळगाव : संगणक परिचालकांचे मानधन रखडले; कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salary

जळगाव : संगणक परिचालकांचे मानधन रखडले; कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ

अमळनेर (जि. जळगाव) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या ‘आपले सरकार सेवा’ केंद्रातील संगणक परिचालकांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन रखडले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, संबंधित कंपनी दर महिना लाखो रुपये कमावून मालामाल होत असल्याने प्रशासनप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील संगणक परिचालक आंदोलनाच्या करण्याच्या पवित्र्यात आहे. तरी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (Latest Marathi News)

ग्रामविकास विभाग व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांना ऑनलाइन सेवा पुरविण्यासाठी २०११ पासून ‘संग्राम प्रकल्प’ सुरू करण्यात आला होता. तोच प्रकल्प पुढे जाऊन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ म्हणून पुढे सुरू ठेवण्यात आला. या केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नेमणूक केलेल्या संगणक परिचालकांकडून ग्रामपंचायतीच्या सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने देणे,जातीचे दाखले, जन्म मृत्यू दाखले व इतर शासकीय योजनांच्या सेवा देण्यात येत असतात.

हेही वाचा: शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या मुलाला मारण्याची धमकी

शासन स्तरावरील विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे व गावातील नागरिकांना सोईसुविधा पुरविण्याकरिता संगणक परिचालक शासन व जनतेमधील दुवा म्हणून काम करीत असतात. मात्र रात्रंदिवस काम करणाऱ्या संगणक परिचालकांना चार- चार महिने मानधन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संगणक परिचालक आंदोलनाच्या करण्याच्या पवित्र्यात असून, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शिंदे सरकारकडून अपेक्षा

संगणक परिचालकांना शासन कर्मचारी म्हणून समाविष्ट करण्यासाठी संगणक परिचालक संघटनेकडून गेल्या १० वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करण्यात आली. नागपूर येथील अधिवेशन असो की मुंबई येथील अधिवेशन, प्रत्येक अधिवेशनात संगणक परिचालकांवर अन्याय करण्यात आला असून, प्रत्येकवेळी शासनाकडून पोकळ आश्वासने देऊन त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. महिन्याभरापासून नवीन सरकार स्थापन केलेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून संगणक परिचालक यांच्या मोठ्या अपेक्षा असून, शिंदे सरकारने संगणक परिचालकांना शासन सेवेत समाविष्ट करण्याच्या प्रमुख मागणीला विनाअट मान्य करावे, अशी संगणक परिचालकांना आस लागून आहे.

हेही वाचा: Uday Samant Attack : पुण्यातील दोन शिवसैनिकांना अटकपूर्व जमीन मंजूर

कंपनी तुपाशी अन् परिचालक उपाशी

शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांच्या खात्यात दर महिन्याला जिल्हा परिषद स्तरावरून आरटीजीएस पद्धतीने मानधनापोटी सात हजार रुपये दिले जातात. मात्र मागील चार महिन्यांपासून संगणक परिचालकांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. विशेष म्हणजे शासन हे संगणक परिचालकांच्या मानधनापोटी ग्रामपंचायतीकडून दर महिन्याला बारा हजार रुपये सीएससी कंपनीला आरटीजीएस पद्धतीने वार्षिक रक्कम आगाऊ जमा करून घेत असते. सीएससी कंपनीचा उघडउघड घोटाळा अजूनही शासनाच्या नजरेस येत नसल्याने संगणक परिचालकांमध्ये संतापाची लाट आहे.

Web Title: Salary Of Computer Operator In Gram Panchayat Stopped In Jalgaon District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..