
महामार्गावर वाळूचे डंपर, ओव्हरलोड वाहतूक सुसाट; RTOचे दुर्लक्ष
जळगाव : वाळूचे लिलाव झाल्यानंतर वाळू वाहतूक करणाऱ्यांना आता चेव आला आहे. महामार्गावरून वाळूचे डंपर, ट्रॅक्टर भरधाव वेगाने नेण्याची जणू स्पर्धाच महामार्गावर पहावयास मिळते. भरधाव वेग नेहमी शंभरच्या वर असतो. वाहनांचा वेग, ओव्हरलोड तपासून दंडाचा अधिकार ‘आरटीओ’ विभागाचा असतो. मात्र आरटीओ विभागही ‘अर्थपूर्ण’रित्या बघ्याची भूमिका घेत असल्याचा वाहनधारकांमध्ये बोलले जात आहे. (Sand dumpers overloaded trucks on jalgaon highway)
सध्या शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झालेले आहे. कालिका माता मंदिर ते तरसोद व तरसोद ते चिखलीपर्यंतचा महामार्ग चौपदरी झाला आहे. यामुळे सर्वच वाहनांचा वेग वाढला आहे. असे असले तरी अतिशय तुफान वेगाने जाणाऱ्या वाहनामध्ये सध्या वाळू, मुरूम, खंडीने भरलेल्या डंपरचा वेग शंभरच्या पुढे आहे. विशेष म्हणजे ही वाहने ओव्हरलोड असतात. गिरणा नदीपात्रातून वाळूने भरलेले डंपर, ट्रॅक्टर निघाले की अवघ्या दहा मिनिटात आकाशवाणी चौकात पोचते. यावरून त्याचा किती स्पीड असेल याची कल्पना येते. रस्त्यात येणाऱ्या इतर वाहनाना कट मारीत, मोठ्याने हॉर्न वाजवित, लहान वाहनांना रस्त्याच्या कडेला उतरविण्यास भाग पाडून ही वाहने भरधाव वेगान पुढे जाताना दिसतात.
हेही वाचा: मध्य रेल्वेचा 9 दिवस ट्रॅफिक ब्लॉक; 'या' गाड्या रद्द
कर्कश मोठ्याने हॉर्न
दोन वर्षापूर्वी शहरातील वाळूच्या भरधाव जाणाऱ्या डंपरने दोन बालकांचे बळी घेतले जाते. तेव्हापासून वाळू, मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरमध्ये वेग मोजणी यंत्र ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. सोबतच वाहनचालक जर मद्यपान करून वाहन चालवित असल्याचे दिसून आल्यास त्याची त्याचठिकाणी मुखतपासणी करणारे यंत्रणही ठेवण्याचे आदेश होते. या आदेशाला केव्हाच डंपर चालकांनी तिलांजली दिली आहे.
महसूल अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट
शहरातून जाणाऱ्या वाळूच्या वाहनांचा वेग, चालकांची तपासणीचे अधिकार महसूल विभागाला आहेत. मात्र महसूल अधिकाऱ्यांनी कधी वाहनांच्या वेगाची तपासणी केल्याचा अहवाल नाही. की कधी वाहनचालकांनी मद्यपान केले आहे किंवा नाही यावर कारवाईही केलेली नाही. सर्वांचेच तोंडावर बोट आहे.
हेही वाचा: चोपडा-शिरपूर रस्त्यावर रस्तालूट; 60 हजारांचा ऐवज लंपास
वेगावर नियंत्रण नाही
महामार्गावरून मोठी वाहने नेताना ९० चा स्पीडने चालविण्यास परवानगी आहे. मात्र वाळूची वाहने ११० ते १२० च्या स्पीडने जातात त्यावर आरटीओ विभाग कारवाई करीत नाही. महामार्गाच्या कडेला (नशिराबाद जवळ) वेग तपासणी वाहन ठरावीक वेळेत असते. ते फक्त लहान चारचाकी गाड्यावर कारवाई करते. डंपर ज्या वेगाने जातात त्यावर कधी कारवाई झाल्याचा तपशिल नाही.
''महामार्गाने जाताना वाळूने भरलेले डंपर, ट्रक्टरने अनेक वेळा दुचाकीस्वारांच्या वाहनांना कट मारतात. परिणाम ही वाहने रस्त्याच्या एकीकडे जावून फेकली जातात. आरटीओ विभाग या वाहनावर कारवाई करतो की नाही याबाबत शंका आहे ?'' - किरण झोपे, दुचाकी वाहनचालक
Web Title: Sand Dumpers Overloaded Trucks On Jalgaon Highway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..