
जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घर घर तिरंगा’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शासनासह अनेक संस्था, संघटना सहभागी झाल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
आयुष्यातील उमेदीचा काळ देशासाठी दिला. त्या सर्वांचं बलिदान आपण स्मरावं, देशाविषयी, राष्ट्रध्वजाविषयी आदर, सन्मान निर्माण व्हावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. देशप्रेमाच्या याच भावनेनं जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील काही दिव्यांग भगिनींनीही आता या उपक्रमात सहभाग घेत खारीचा वाटा उचलला आहे.
स्वयंदीप दिव्यांग महिला निवासी संस्था, बचत गटामार्फत या भगिनी दिवसभरात हजार ते बाराशे राष्ट्र्रध्वज शिवून तयार करीत आहेत. (sewing work of national flag has increased confidence of disabled women jalgaon Latest Marathi News)
या मोहिमेतंर्गत जळगाव जिल्हा प्रशासनाने तिरंगा झेंडा शिवण्याचे काम चाळीसगावच्या स्वयंदीप दिव्यांग महिला निवासी संस्थेला दिले आहे. राष्ट्रध्वज शिवण्याचा मान मिळाल्याने या महिलांचा आत्मविश्वास उंचावला असून, आपण देशासाठी काही तरी करू शकलो, याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
अन् जिल्हाधिकाऱ्यांचा होकार
‘घरोघरी तिरंगा’ बाबतचा स्वयंदीप दिव्यांग संस्थेच्या संचालिका मिनाक्षी निकम यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधला.
आपल्या संस्थेला हे काम मिळाले तर संस्थेतील दिव्यांग महिलांना रोजगार तर मिळेलच शिवाय देशाची शान असलेला आणि स्वातंत्र्यदिनी घराघरांवर डौलात फडकणारा राष्ट्रध्वज आपल्या हातून तयार झालाय, या विचाराने त्यांचा आत्मविश्वासही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राऊत यांनीही लगेच निकम यांना होकार दिल्याने तिरंगा शिवण्यासाठी स्वयंदीप संस्थेच्या महिला मोठ्या उत्साहाने कामाला लागल्या आहेत.
हजार ते बाराशे झेंडे तयार
तिरंगा शिवण्याच्या कामात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे सहकार्य लाभले आहे. चाळीसगाव गटविकास अधिकारी यांनी ३१ हजार तिरंगा शिवण्याचे काम दिले आहे. चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ठोंबरे यांनी एक हजार तिरंगा शिवण्याचे काम देण्यात आले आहे.
सध्या या संस्थेत ८० ते ८५ महिला काम करतात. यामध्ये निवासी केंद्रातील २५ दिव्यांग भगिनींसह काही विधवांचाही सहभाग आहे. हे काम मिळाल्यापासून संस्थेत एक प्रकारे आनंदाचे वातावरण असून, महिला दिवसभरात हजार ते बाराशे झेंडे तयार करताहेत, अशी माहिती संचालिका निकम यांनी दिली
"देशासाठी अभिमान असलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत दिव्यांगांना समावून घेता आले याचे समाधान आहे. राष्ट्रध्वज तयार करण्याचे काम मिळाल्याने या सर्व दिव्यांग महिलांमध्ये नक्कीच आत्मविश्वास दुणावणार आहे." - अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.
"दिव्यांग असल्याने कोणाकडे हात पसरविण्यापेक्षा देशासाठीच्या कामात सहभागी घेणे कधीही चांगले. आमच्या हाताने राष्ट्रध्वज तयार होत असल्याने आत्मविश्वास यामुळे नक्कीच उंचावेल."
- भारती चौधरी, दिव्यांग महिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.