Balasaheb Thackeray Jayanti: प्रतिमापूजनावरून ठाकरे, शिंदे गटात धुसफूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shinde group shivsena and thackeray group shivsena

Balasaheb Thackeray Jayanti: प्रतिमापूजनावरून ठाकरे, शिंदे गटात धुसफूस

जळगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जळगाव महापालिकेत प्रतिमापूजनावरून शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात चांगलेच राजकारण तापले. महापालिकेतील शासकीय प्रतिमापूजनाला निमंत्रित न केल्याबद्दल शिंदे गटाने सत्ताधारी ठाकरे गटाच्या महापौर जयश्री महाजन यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. (Shiv Sena Thackeray Shinde factions heated up politics over balasaheb Thackeray idol worship jalgaon news)

त्यामुळे महापालिकेत महापौरातर्फे शासकीय कार्यक्रम झाला, तर शिवसेना शिंदे गटातर्फे स्वतंत्र कार्यक्रम झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत शासकीय प्रतिमापूजन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते झाले.

महापालिकेचे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते बंटी ऊर्फ अनंत जोशी, आस्थापना उपायुक्त चंद्रकांत वानखेडे, उपायुक्त गणेश चाटे, कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यावर महापौर दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेल्या.

त्यानंतर शिंदे गट शिवसेनेचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील, नगरसेवक दिलीप पोकळे महापालिकेत आले. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा, हार व फुले सोबतच घेउन ते आले होते. मात्र, या ठिकाणी अगोदरच प्रतिमापूजन झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले वाहिली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : वाडे येथील जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, महिला आघाडीच्या सरीता माळी-कोल्हे, नगरसेक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, ज्योती चव्हाण, श्‍याम कोगटा आदी उपस्थित होते. याबाबत शिंदे गटाचे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे म्हणाले, की बाळासाहेबांच्या प्रतिमेचे शासकीय पूजन होते. त्यामुळे नगरसेवक म्हणून महापौर किंवा प्रशासनाने आम्हाला निमंत्रित द्यायला हवे होते.

मात्र, त्यांनी आम्हाला आमंत्रण दिले नाही. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी महापालिकेत त्यांची प्रतिमा व पुष्पहार घेऊन आलो होतो. आम्हाला अगोदरच माहिती दिली असती, तर आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असतो.

आम्हाला निमंत्रण नसल्यामुळे आम्ही वैयक्तिक प्रतिमा घेऊन आलो होतो. मात्र, अगोदरच त्या ठिकाणी फोटो असल्याचे समजल्यावरून आम्ही बाळासाहेबांचा दुसरी प्रतिमा न लावता अगोदर असलेल्या प्रतिमेलाच माल्यार्पण केले. आम्हाला हेतूपुरस्सर महापौरांनी डावलल्याचे दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता, महापालिकेच्या सामान्य प्रशासन उपायुक्तांमार्फत शासकीय कार्यक्रमाचा आदेश काढला होता. महापौर, उपमहापौर व आयुक्तांना समारंभास उपस्थित राहण्याबाबत सूचित केले होते. त्यात कोणत्याही नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे पत्र नसल्याचे दिसून आले.

हेही वाचा: Bahinabai Mahotsav: बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी समारोप; महोत्सवात कोटीची उलाढाल