Suresh Jain: निवडणूकीच्या तोंडावर सुरेश जैन यांची राजकीय निवृत्ती चर्चेत; आघाडीसाठी धक्का, महायुतीसाठी लाभदायी; निर्णयाचे कारण अनुत्तरितच

Suresh Jain: राज्याचे माजी मंत्री, राजकारणातील आक्रमक चेहरा व शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते सुरेशदादा जैन यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
Suresh Jain
Suresh JainEsakal

जळगाव : राज्याचे माजी मंत्री, राजकारणातील आक्रमक चेहरा व शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते सुरेशदादा जैन यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. तसे सुरेशदादा जैन गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रीय नाहीतच परंतु त्यांनी लोकसभा निवडणूकीत शिवसेना (उबाठा) पक्षाचा उमेदवार प्रथमच रिंगणात उतरलेला असतांना त्याच पक्षाच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा देत निवृत्तीची वेळ का साधली याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सन १९८० मध्ये खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश केला आहे. मात्र त्याही अगोदर त्यांनी एक धाडसी काम केले होते. आणिबाणी संपल्यानंतर देशभरात जनता पक्षाची राजवट होती, त्या काळात माजी पंतप्रधान (स्व.) इंदिरा गांधी यांचा जळगाव येथे दौरा होता. त्या काळी हेलीकॉप्टर उतरविण्यासाठी पोलीस मैदान या ठिकाणी एकमेव सुविधा होती.

मात्र त्यावेळच्या सरकारने त्यांना हेलीकॉप्टर उतरविण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांच्या जळगाव दौऱ्याची अडचण निर्माण झाली होती. परंतु सुरेशदादा जैन यांनी त्यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन आपल्या खासगी मालकीच्या खानदेश मिलच्या जागेत हेलीकॉप्टर उतरविण्यास जागा दिली होती. इंदिरा गांधी या सुध्दा हेलीकॉप्टरने जळगावी आल्या व त्या मीलच्या जागेत उतरून त्यांनी जळगावात रोड शो करीत सभा घेतली होती. त्यावेळी ही सभा संपूर्ण राज्यभरात चर्चेत होती.

Suresh Jain
Lok Sabha Election: 'त्या' रात्री PDCC बँक सुरू ठेवणं मॅनेजरला भोवलं; निवडणूक आयोगाने घेतली मोठी अ‍ॅक्शन

पुढे राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत इंदिरा कॉंग्रेसचे उमेदवार ईश्‍वरलाल ललवानी यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी ललवानी प्रथमच जळगावातून आमदार म्हणून निवडून आले होते. एवढे सर्व असले तरी सुरेशदादा जैन यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला नव्हता.

सन १९८० मध्ये सुरेशदादा जैन हे कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले व त्यांच्या राजकीय कारकिर्दीस प्रारंभ झाला. त्यानंतर जळगाव नगरपालिकेत त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले, त्यात त्यांना यश मिळाले आणि जळगावचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले. सुरेशदादा जैन यांनी पक्षाबाबत निष्ठेचे कधीच ढोंग केले नाही.जनतेसाठी आपण अनेक वेळा पक्ष बदलू असे त्यांनी जाहीर वक्तव्य केले होते. त्यांनी जीवनात अनेक पक्ष बदलले आहेत. परंतु ज्या पक्षात ते गेले त्या ठिकाणी त्यांनी निष्ठेने काम केले.

Suresh Jain
Weather Update : पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून हायअलर्ट

१९८५ मध्ये ते समाजवादी कॉंग्रेसतर्फे आमदार झाले, १९९० मध्ये सरतचंद्र सिन्हा समाजवादी पक्षातर्फे ते निवडून आले. १९९५ मध्ये कॉंग्रेसतर्फे तर १९९९ मध्ये ते शिवसेनेतर्फे आमदार झाले. सन २००४ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदार झाले तर सन २००९ मध्ये शिवसेनेतर्फे जळगाव विधानसभेतून आमदार झाले.

सुरेशदादा जैन यांचा राजकारणात आक्रमक स्वभाव होता. राज्यात शिवसेनेत असताना सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे मोठ्या प्रमाणात आमदार फोडून त्यांनी सरकार स्थापनेची तयारीही केली होती. त्यांनी स्वत:च्या बळावर हे आमदार फोडले होते. त्यावेळी पक्षनेतृत्वाची साथ मिळाली असती तर ते राज्याचे मुख्यमंत्रीही झाले असते. मात्र त्यांच्या या प्रयत्नाला शिवसेना पक्षनेतृत्वाची साथ मिळाली नाही. परंतु त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली नाही. जळगाव पालिका घरकुल प्रकरणात त्यांना शिक्षा झाल्यानतंर त्यांनी सन २०१४ मध्ये शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. पक्षाच्या व्यासपीठावर ते कधीच दिसले नाहीत.

Suresh Jain
NDA Pune: पुण्यात खळबळ, एनडीए परिसरात सापडला बॉम्ब

सन २०२४ मध्ये लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्‍न निर्माण होत होते. मात्र त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नाही.निवडणूका जाहीर झाल्यानंतर जळगाव लोकसभेतून शिवसेना ठाकरे गटातर्फे प्रथमच उमेदवार रिंगणात उतरविण्यात आला.तर भाजपचाही उमेदवार रिंगणात उतरला. मात्र दोन्ही उमेदवारांनी त्यांची भेट घेतली. दोन्ही उमेदवारांना त्यांनी आशीर्वादही दिले. त्यामुळे त्यांची भूमिका गुलदस्त्यातच होती.परंतु ऐन निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतांना सुरेशदादा जैन यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी निवृत्ती जाहीर केली. त्यांनी थेट शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचे पत्र पाठविले आहे.

सुरेशदादा जैन हे आपल्या कोणत्याही बाबीचे राजकारण करीत नाही, शिवसेना एकेकाळी बहरात असतांना त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांना भेटून राजीनामा दिला होता. त्यावेळेचे ते धाडसच होते. आज ऐन लोकसभा निवडणूकीच्या काळात त्यांनी निवृत्ती का जाहीर केली, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी निवृत्ती जाहीर केली असल्याने ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याला मात्र कितपत अर्थ उरतो हा प्रश्‍नच आहे. परंतु जळगाव लोकसभा मतदार संघात प्रथमच शिवसेना (उबाठा) पक्षाचा उमेदवार असतांना त्यांनी घेतलेला हा निर्णय शिवसेनेसाठी धक्कादायक आहे.

Suresh Jain
C.M. Eknath Shinde Interview : जनता महायुतीच्याच पाठीशी;मुख्यमंत्री शिंदे,घरी बसणाऱ्यांना सहानुभूती मिळणार नाही

मात्र भाजपसाठी तेवढाच फायदेशीर असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मागे भाजपचा काही राजकीय डाव आहे याचीही आता चर्चा सुरू आहे . त्यामुळे प्रत्येक गोष्ट जाहीरपणे करणाऱ्या सुरेशदादा जैन यांनी त्यांच्या राजकीय निवृत्तीचा निर्णय आताच का घेतला याचे उत्तर मात्र ते देतीलच किंवा येत्या काळाच्या ओघातही ते निश्‍चीत सापडेलही. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर वेळेची प्रतीक्षा करणे एवढेच जनतेच्याही हातात आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com