
Jalgaon Crime News : ‘अंकल, अपुन को भाई बनना है... पेपर में बडा फोटू दो, लोक डरना मंगता है...’ हे उदगार चित्रपटातील नाही, तर जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी पिस्तूल, १५ जिवंत काडतुसासह अटक केलेल्या नमीर खान आसिफ खान (वय १९) या तरुणाचे आहेत.
शहरातील गुंडगिरीत आपले नाव व्हावे, या उद्देशाने झपाटलेल्या या तरुणावर यापूर्वी चाकूहल्ला आणि दोन गटांतील हाणामारीचा गुन्हा दाखल आहे. अटकेतील संशयिताची खातरपाणी पोलिस कशा पद्धतीने करतात त्यावर त्याच्या गुन्हेगारी वाटचालीचा मार्ग ठरणार आहे.( strange story of young man in custody in jalgaon crime news)
‘भाई बनना है...’
जळगावच्या काट्याफैल भागातील ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाला मात्र गुंडगिरीत नाव कमवायचे आहे (भाई बनना है). लोकांमध्ये आपल्या नावाची दहशत व्हायला पाहिजे, अशी इच्छा बाळगून वावरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यावर त्यास कमालीचा आनंद झाला.
कंबरेतून पिस्तूल काढून दिली सोबतच १५ जिवंत काडतूस त्याने काढून देत ताब्यात घेतल्यावर हसत हसत तो पोलिस वाहनात बसला. रीतसर पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून अटक केली. त्याला पकडून दोन-तीन पोलिस घेऊन जाताय, याचाही त्याला खूप आनंद झाल्याचे तो सांगत होता.
‘थँक्यू अंकल’ म्हणत पोलिसांचे मानले आभार
नमीर खान आसिफ खान याच्या अटकेची कारवाई पूर्ण झाल्यावर त्याने गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. ‘अंकल, थँक्यू.. बरसो की तमन्ना तुमने आज पुरी कर दी.. पेपर में जरा बडासा फोटू दो, लोग डरने होना.. अब आएगा मजा...’, असे म्हणत आता पेपरमध्ये बातम्या छापून आल्यावर लोक सलाम करतील, असेही त्याने पोलिस चौकशीत सांगितले.
गुन्हेगारीची अशी लागली ओढ
नमीर खान या तरुणावर गेल्या वर्षभरात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. काट्याफैल येथील मलिक कुटुंबीयांसोबत झालेल्या दोन गटांच्या हाणामारीच्या गुन्ह्यात तो विरोधी गटाकडून संशयित होता. तर सिंधी कॉलनीतील एका तरुणाला चॉपर मारून जखमी केल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती.
कारागृहात गेल्यावर गुन्हेगारीच्या एखाद्या विद्यापीठातच त्याला दाखला मिळला. कारागृहातील वेगवेगळ्या गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगारांचे राहणीमान, बोलणे-चालण्याची स्टाइल, रुबाब आणि त्याची दहशत याचे किस्से ऐकून नमीरलाही गुन्हेगारीची ओढ लागली.
अटक करणारे पथकही हैराण
काट्याफैल भागात एक तरुण लोडेड पिस्तुलीसह दहशत माजवत असल्याची माहिती निरीक्षक किशन नजन पाटील यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक नीलेश राजपूत, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौभे, विजयसिंग पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, जितू पाटील, नितीन बाविस्कर, विजय पाटील अशांच्या पथकाने त्यास अटक केली. त्याचा कबुलीनामा ऐकत पथकही हैराण झाले. अटक केली नसती तर तो फायरिंग करणार होता, असेही त्याने चौकशीत कबूल केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.