
जळगाव : तापीला पूर, तरीही बोटीतून जीवघेणा प्रवास!
जळगाव :चोपडा जाण्यासाठी खेडीभोकरी ते भोकर या दरम्यान तापी नदीवरील हंगामी लाकडी पूल पावसाळ्यात म्हणजे जूनपासून सहा महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद होतो. दरम्यान हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आल्याने तापी नदीला मागील महिन्यात मोठा पूर येऊन गेला आहे.
आता देखील पुराचे पाणी पूर्णतः कमी झालेले नाही. तरी देखील तापी नदीतून बोटीवर प्रवाशांसोबत दुचाकी उभ्या करून जीवघेणा प्रवास केला जात आहे. यात काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नदेखील यामुळे निर्माण होत आहे. (Tapi river flood still dangerous journey by boat by villagers Jalgaon Latest marathi news)
जळगाव तालुक्यातील भोकर आणि चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी या दोन गावांना जोडण्यासाठी तापी नदीवर ब्रिटिशकालीन हंगामी लाकडी पूल टाकण्यात येत असतो. या पुलाचा वापर चोपडा, जळगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यात जाण्यासाठी कमी अंतराचा व सोयीचा ठरतो. यामुळे पुलावरून होणारी रहदारी ही बरीच आहे.
नदीला पूर असताना बोटीतून प्रवास
जानेवारी– फेब्रुवारीपासून नदीवर पूल टाकून तो साधारण ३१ मेपर्यंत रहदारीसाठी वापरला जातो. पावसाळ्यात मात्र हा पूल काढून टाकला जात असला तरी एका बाजूने नदीच्या दुसऱ्या काठावर सोडण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे.
मात्र या बोटींमधून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचा अनुभव येथून जाणाऱ्या प्रत्येकाला येत आहे. मुळात बोटीतून प्रवास करताना बोट उलटल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. तरी देखील हा जीवघेणा प्रवास तापी नदीतून सुरू आहे.
हेही वाचा: शिक्षणासाठी दरेवाडीचे चिमुरडे निघाले उपाशीपोटी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात
बोटीत गाडी अन् नागरिकही
खेडीभोकरीच्या पायथ्याशी बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. मुळात बोटींमधून नागरिकांना एका काठावरून दुसऱ्या काठावर नेण्याचे काम करणे अपेक्षित आहे. परंतु नागरिकांसोबत दुचाकी देखील ठेवल्या जात आहेत.
एका कोटीवर आठ- दहा दुचाकी ठेवून नागरिकांना बसविले जाते. यामुळे नागरिक आणि दुचाकी अशा वाहतुकीत काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न समोर येत आहे.
...तर पंधराचे होतात सत्तर किलोमीटर
भोकर ते चोपडा हे अंतर फक्त पंधरा किलोमीटर आहे. मात्र, पूल बंद झाल्यास हे अंतर 70 किलोमीटरचे होते. परिणामी वेळ व पैसा देखील खर्च होतो. पैसा व वेळ वाचण्यासाठी वाहनधारक तापी नदीतून बोटीतून प्रवास करत आहेत.
हेही वाचा: विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावाचे बनावट WhatsApp Account!
Web Title: Tapi River Flood Still Dangerous Journey By Boat By Villagers Jalgaon Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..