शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपची कमाल; चार वर्षात एवढ्या कुटुंबीयांना मिळाला आर्थिक आधार

mehunbare
mehunbare

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : एकीकडे सोशल मीडियाच्या अतिरेक वापराबाबत सर्वत्र चिंता व्यक्त होत असतांना दुसरीकडे याच सोशल मीडियाच्या वापराचे सकारात्मक पैलूही समोर येत आहेत. आपल्या सहकारी शिक्षकाचा आकस्मिक मृत्यु झाल्यानंतर त्याचा परिवार उघड्यावर पडू नये, यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शिक्षकांनी चाळीसगाव मदत कृती समिती परिवाराच्या माध्यमातून शिक्षकांचा व्हॅाटसअप ग्रुप तयार केला. त्यातून या शिक्षकांनी गेल्या चार वर्षात सुमारे 12 मृत शिक्षकांच्या कुटुंबियांना 30 लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे. शिक्षकांच्या या माणूसकीचे कौतुक होत आहे. राज्यात कुठेच असा उपक्रम राबविला जात नसेल असा उपक्रम केवळ चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी राबवून आपल्या मृत सहकारी शिक्षकांच्या कुटुंबियांच्या मदतीचा हात दिला आहे.

शिक्षकांची नोकरी ही सुखाची नोकरी असते असे म्हटले जाते. मात्र अचानक उदभवलेला आजार त्यातून कुटुंबावर ओढवलेले आर्थिक संकट आणि उपचारावर होणारा खर्च याची सांगड घालता येत नाही. त्यात एखाद्या शिक्षकाचा मृत्यु झाला त्याच्या कुटुंबियाची परवड होते. मृत्युनंतर या शिक्षकाच्या कुटुंबियाला शासकीय आर्थिक लाभ हा लगेच मिळत नाही. अशावेळी त्याच्या कुटुंबाची, मुलाबाळांच्या शिक्षणाची परवड होते. ही अडचण लक्षात घेऊन अशा मृत शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी, अशी संवेदना बाळगत चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत मृत शिक्षकांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीचा नवा आदर्श उपक्रम हाती घेतला आहे.

राज्यात आदर्श उपक्रम... 

चाळीसगाव मदत समिती परिवार असे या उपक्रमाला नाव दिले. साधारणत: 600 जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत. या शिक्षकांच्या इच्छा शक्ती नुसार 2016 पासून मदतीची परंपरा जोपणार राज्यात असा उपक्रम फक्त चाळीसगाव तालुक्यातील शिक्षकांनी निस्वार्थीपणे संकटग्रस्त बंधू भगिनी व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे. तालुक्यातील व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातुन यथाशक्ती संबधीत कुटुंबाला त्या दुःखातून सावरण्यासाठी आजपर्यत 30 लाख रूपयांची मदत दिली आहे.

कुटुंबातील सदस्यांना दिली मदत... 

व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत मृत्यू झालेले शिक्षक त्यात कै. भरत ठाकूर कोंगानगर, कै.सुधाकर सुर्यवंशी वाघळी, श्रीमती काळे मॅडम भऊर, कै.शेखर सैदाणकर दसेगाव, कै.नकाशे अमरावती, कै.संभाजी गोसावी करगाव तांडा, कै.राजेंद्र पाटील शिंदी (ता.भडगाव), कै.सुनिल चव्हाण पिंपळगाव (ता.पाचोरा), कै.लखीचंद कुमावत केंद्र प्रमुख मेहुणबारे, कै.सुशिल पाटील केंद्र प्रमुख पिलखोड यांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात आली आहे. या आर्थिक मदतीचा या सर्व शिक्षक कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी फायदा होत आहे. तोच खरा आर्शिवाद असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

तालुक्यातील 90 टक्के शिक्षक व निस्वार्थी भावनेने सतत मदतीला तयार असतात. ग.स. सोसायटी, पारोळा सोसायटी वा जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून अपेक्षा न ठेवता मदतीचा हा झरा अखंड ठेवत आहे. त्यासाठी आजपर्यत तालुक्यातील एकही शिक्षकाने स्वत:ला श्रेय घेतले नाही. त्यामुळे तालुक्यात सर्व शिक्षकांमध्ये एकी असल्यामुळे आपली शाळा आदर्श कशी होईल, यासाठी झटणारे शिक्षक असो,आदर्श शिक्षक पुरस्कार असो अशा सर्वांनी एकत्र येत समाजापूढे माणुसकी हाच धर्म असल्याचे दाखवून दिले आहे. शिक्षणाचे पवित्र कार्य करण्याबरोबरच अडचणीत आलेल्या आपल्या शिक्षक सहकाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात, असे  शिक्षक महेंद्र शिसोदे यांनी सांगितले. 

मुलीच्या नावाने बँकेत पावती... 

तळोंद्रे प्र.दे जि.प. शाळेचे शिक्षक नरेंद्र जगतसिंग पाटील यांचे गेल्या महिन्यात आजारामुळे निधन झाले. यामुळे त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक हातभार लागावा म्हणून शिक्षकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद लाभून सुमारे 2 लाख 23 हजार 300 रूपयांची रक्कम जमा झाली. गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षणधिकारी विलास भोई, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र महाजन, सर्व शिक्षक संघटना, शिक्षक बंधू यांच्या उपस्थितीत कै. नरेंद्र पाटील यांच्या कुटुंबाकडे (ता.10) रोजी 2 लाख 10 हजार रूपयांचा धनादेश आणि बँकेत जमा निधी रक्कम रूपये 13 हजार असा असा सुमारे 2 लाख 23 हजार रूपयांची मदत निधी कै. नरेंद्र पाटील यांचे वडिल जगतसिंग पाटील व पत्नी श्री. शिसोदे मुलगा व मुलगी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या रकमेची त्यांची मुलगी खुशी हिच्या नावे 15 वर्षाची पावती करण्यात आली. यावेळी महेंद्र शिसोदे, राजेंद्र पाटील, विजय निकम, दिलीप सावंत, विनायक ठाकूर, उमेश चव्हाण,चंद्रवाणी पगारे, भागवत हडपे, दिगंबर मोरे आदी शिक्षक उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com