रस्ते अपघातातील जखमींना वाचविणारा ‘रावेर पॅटर्न’ला सुरुवात होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

रस्ते अपघातातील जखमींना वाचविणारा ‘रावेर पॅटर्न’ला सुरुवात होणार

रावेर (जि. जळगाव) : रस्ते अपघातातील जखमींचे जीव वाचवणारा ‘डॉक्टरांच्या गाडीत जीवरक्षक औषधे व अत्यावश्यक साहित्य ठेवण्याचा’ रावेर पॅटर्न जळगाव जिल्ह्यात लवकरच राबविला जाणार असून, १९ मेस जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीत त्याची रावेरला सुरवात होणार आहे.

रस्त्यावर होणाऱ्या अपघातात वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्याने रुग्ण रस्त्यातच दगावतात. त्याचे प्रमाण भारतात खूप मोठे आहे. अपघातानंतर पहिल्या एक तासात योग्य तो उपचार मिळाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते, हे लक्षात घेऊन येथील माऊली हॉस्पिटलच्या डॉ. योगिता संदीप पाटील आपल्या गाडीत असे किट गेल्या काही महिन्यांपासून ठेवत आहेत. प्रवासात अशा चार रुग्णांवर त्यांनी मागील ४ महिन्यांत उपचार केले आहेत आणि त्या रुग्णांचे प्राण वाचले आहेत. याबाबत रावेर दौऱ्यात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना माहिती कळली. डॉक्टरांच्या गाडीत ही सगळी जीवनरक्षक औषधे, महत्त्वाची इंजेक्शन्स, जखमांवर टाके घालण्याची सोय ही कल्पना त्यांना आवडली. त्यांनी त्याची सविस्तर माहिती डॉ. योगिता पाटील आणि डॉ. संदीप पाटील यांच्याकडून घेतली. जिल्ह्यातील सर्वच डॉक्टरांच्या गाडीत असे किट ठेवल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतील, असा विचार त्यातून पुढे आला.
सुरवातीला हा पॅटर्न रावेर तालुक्यात राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील सुमारे ५० डॉक्टरांच्या गाड्यांमध्ये हे किट देण्यात येणार असून, लवकरच हा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे. हे किट सुरवातीला लोकसहभागातून उपलब्ध करून घेतले जात आहे. १९ मेस जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीत रावेर येथे या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. पोलिस निरीक्षक कैलास नागरे व सहकारी संयोजन करीत आहेत.

हेही वाचा: जळगाव शहरात विजेचा लपंडाव; महावितरण कार्यालयातील दूरध्वनी व्यस्त

११ हजार ९६० जणांचा मृत्यू

रस्ते अपघातात मागील वर्षभरात जगभरात सुमारे साडेबारा लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर भारतात हे प्रमाण दीड लाख इतके आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी २६ हजार २८४ अपघातात १४२६६ जण जखमी झाले असून, त्यातील मृत्यू पावलेल्यांची संख्या ११ हजार ९६० इतकी मोठी आहे. रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या आगामी दोन वर्षांत किमान निम्म्यावर आणण्याचे शासनानेही उद्दिष्ट असून, हा रावेर पॅटर्न त्यासाठी पूरक ठरेल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: आईच्या शेतावरून पेटली भावंडात ‘भाऊबंदकी’; नातवाने गमावले प्राण

Web Title: The Raver Pattern Will Begin To Save The Injured In Road Accidents

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonaccident
go to top