ग्राहक असुरक्षित; फुले मार्केट चोरट्यांच्या ताब्यात 

रईस शेख
Monday, 4 January 2021

बहुतांश दुकानात व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे तैनात असताना गर्दीत चोरटे काम फत्ते करुन पसार होतात.

जळगाव ः शहरातील फुले मार्केटमध्ये एकाच दिवसात दोन चोरीच्या घटना घडल्या, एका महिलेच्या पर्स मधुन ४२ हजार लंपास झाले, तर दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगलपोत तोडून चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे दोन्ही गृहिणी खोटेनगर येथीलच रहिवासी आहेत. शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले फुले मार्केट सध्या चोरट्यांच्या ताब्यात गेल्याची अवस्था असून पोलिसांचा धाक संपला आहे. 

खोटेनगर येथील मंगलाबाई पाटील (वय ५५) शनिवारी बाजारात मुलीच्या लग्नाच्या खरेदला आल्या होत्या. फुले मार्केटमधील मोहन क्लॉथ सेंटरमध्ये सात हजारांच्या साड्या खरेदी केल्यानंतर त्या, कपडे खरेदीला पुढच्या दुकानात निघाल्यावर त्यांना धक्का मारुन पर्समधील ४२ हजार रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. या घटनेला तीन तास उलटत नाही तोवर संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास खोटेनगरातील गणपती मंदिर येथील गृहिणी ऐश्‍वर्या रामकृष्ण सपकाळे (वय-२७) या फुले मार्केटच्या रसवंती शेजारीच सागर बॅग जवळ खरेदी करत असतांना अज्ञात चोरट्याने अलगद त्यांच्या गळ्यातील मंगळपेात तोडून पोबारा केला. ऐश्‍वर्या सपकाळे यांनी समोरच पेालिस ठाणे गाठून घटना कळवल्यावर पोलिसांनी धाव घेतली मात्र, चोरटे पसार झाले होते. अज्ञात चोरट्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल होवून तपास पोलिस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे. 

भुरट्यांसह महिला टोळ्या 
कोरोना लॉकडाऊनच्या काळानंतर आताच बाजारात गर्दी उसळू लागली आहे, त्यात चोरट्यांनी हैदोस घतला आहे. बहुतांश दुकानात व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे तैनात असताना गर्दीत चोरटे काम फत्ते करुन पसार होतात. शहरातील शिवाजीनगर, हुडको, गेंदालाल मिल, आसोदा रोड परिसरातील अनेक सराईत गुन्हेगारांचा मार्केट मध्ये मुक्त वावार आहे. तर, हरिविठ्ठल, सुप्रीम कॉलनीसह परप्रांतीय महिला चोरट्यांच्या टोळ्यांचाही संकुलात प्रचंड उपद्रव आहे. 

पोलिस गस्तीची मागणी 
महापालिका अतिक्रमण विभागाच्या आशिर्वादाने मार्केटच्या पार्किंग केव्हाच विक्री झाल्या आहेत. तर, बाजारातच शहर पोलिस ठाणे असून देखील चोरट्यांना धाक राहिला नाही. मार्केट परिसरात महिला पोलिसांसह बिटमार्शल कर्मचाऱ्यांची गस्त कायम करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft marathi news jalgaon fule market theft swarm police challenge