
दोन अल्पवयीन संशयितांनी पानटपरीसह किरणा आणि हातउसनवारीच्या घेतलेल्या पैशांची परतफेड करकरीत कोऱ्या नोटांनी केली.
जळगाव : तांबापुरासारख्या वस्तीत रहिवास असलेला सतरावर्षीय युवक एकामागून एक उधारीचे पैसे मोजून देत आहे. ते पण कोऱ्या करकरीत नोटांसह रुबाबात याचीच चुणूक गुन्हे शाखेच्या पथकाला लागली.
आवश्य वाचा- एसी दुरुस्ती करतांना रेल्वे रुग्णालयात गॅस सिलिंडरचा स्फोट
चार दिवसांपूर्वीचं गणपतीनगरातील वृद्धाचे घर फोडून ५० हजारांचे दागिने लांबविल्याच्या गुन्ह्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन असल्याने कायद्याचा फायदा कसा घ्यावा, यात तरबेज असलेल्या दोघा संशयितांनी गुन्ह्याची कबुली देत खर्चाचा हिशेबच पोलिसांदेखत मांडला.
अशी केली होती चोरी
गणपतीनगरातील वैभव स्टेट बँक कॉलनी परिसरातील पायोनियर क्लबसमोर कांतिलाल वर्मा (वय ७१) घरात एकटेच राहतात. सकाळ आणि सायंकाळी ते जेवणासाठीचा डबा घेण्यासाठी मुलाच्या घरी जातात. मंगळवारी ते साडेबाराला घर बंद करून गेले. लगेच दुपारी १.२५ च्या सुमारास ते डबा घेऊन परत आले. या वेळी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ५० हजारांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले.
आवर्जून वाचा- जळगाव शहरातील साडेसहाशेपैकी पाचशे किलोमीटर रस्ते खोदलेले
खाली हात गेले आणि बॅगा भरून आले
सुरतला खाली हात गेलेले दोघे मित्र दोनच दिवसांत बॅगा भरून जळगावी परतले होते. नव्या कपड्यांमध्ये परिसरात हिंडताना गल्लीतील इतरांना संशय आला. मात्र, कोणी बोलण्याऐवजी पोलिसांना माहिती मिळताच ताब्यात घेतले.
कोऱ्या नोटांनी फोडले बिंग
तांबापुरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन संशयितांनी पानटपरीसह किरणा आणि हातउसनवारीच्या घेतलेल्या पैशांची परतफेड करकरीत कोऱ्या नोटांनी केली. याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे प्रमोद लाडवंजारी यांना लागली. निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनात किरण धनगर व प्रमोद लाडवंजारी यांनी दोघा संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. यात त्यांनी वर्मा यांच्या घरफोडीची कबुली दिली. अटकेतील दोघेही अट्टल गुन्हेगारापेक्षाही तरबेज असून, यापूर्वीही अनेक गुन्हे दोघांवर दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे