
मुलगी बघायला आले अन् सरबताच्या ग्लासवर उरकले लग्न
जळगाव : एप्रिल- मे महिन्यात जळगावात लग्न करणे म्हणजे वऱ्हाडींचा शिव्या-शाप खाण्यासारखे आहे. ४७ अंश सेल्यिअस तापमानात विवाह करणाऱ्या आयोजकाची दमछाक उडते. मात्र, वयोवृद्ध व चिमुरड्यांच्या आजारपणाचे पाप नशिबी येते. अशात बॅण्ड-बाजा, बारात नको आणि नाहीच हवा कुठला आहेर. सरबताच्या ग्लासवर धुळ्यातील तरुणाने लग्न करून आदर्श ठेवला आहे. (Unique marriage in Jalgaon)
सरबताच्या ग्लासावर नववधूचा स्वीकार
जळगाव शहराचे तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. या तापमानातही लोकांना लग्नाची हौस असते. सहा-आठ महिन्यांपूर्वी सोयरीक जुळवून एप्रिल- मे महिन्यात लग्नाची तिथ काढली जाते. मात्र, त्यावेळी वर आणि वधू पक्षाकडून जळगावच्या तापमानाकडे दुर्लक्ष होते. जिवाची काहीली होणाऱ्या तापमानात लग्नात पुणे-मुंबईसह इतर जिल्ह्यातून जळगावात वऱ्हाडीचे आगमन होते. आयेाजकांकडून त्यांची पूर्ण सोय ठेवली जाते. मात्र, प्रचंड तापमानात पाहुणे मंडळी हैराण होते. मात्र, धुळ्यातील अमीन शेख चांद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हात जोडत केवळ सरबताच्या ग्लासावर नववधूचा स्वीकार केला. उस्मानिया पार्क भागातील मुगल गार्डन कॉलनीतील सानियाबी शेख अनिस या नववधूच्या कुटुंबानेही आनंदाने त्यास मंजुरी देत सायंकाळी हा अगळावेगळा विवाह सेाहळा पार पडला आणि नववधू सासरी रवाना झाली.
हेही वाचा: विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला सहारा
मुलगी बघायला आले अन्...
धुळे येथील अमीन शेख चाँद कापड व्यावसायिक आहे. लग्नासाठी मुलगी बघायला अमीन आई-वडीलांसह जळगावला आले. शहरात आल्यावर ४७ अंश सेल्यिअस तापमानात मुलीच्या घरात शिरल्यावर त्यांनी उत्श्वास सोडताच मुलगी समोर आली. आई-वडील दोघांना मुलगी पसंत पडली अन् जळगावात किती उकाडा होतोय, असा सहज विषय निघाला. कादरिया फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी यांनी एप्रिल मे महिन्यात लग्न करणाऱ्यांवर चर्चा घडवून आणली. ‘तुम्ही तसं करू नका पण’, असे म्हटल्यावर वर-वधूकडील मंडळी कोड्यात पडली. वर-वधूकडील मंडळी लग्नाची चर्चा करीत असताना, साध्यापणाने लग्नावर दोन्ही कुटुंबाचे एकमत झाले. बॅण्ड, बाजा, बारात आहेराचे मानपान काहीच नको. तुम्ही मुलगी द्या, आम्ही सन्मानाने सून स्वीकारतो, असे म्हणत दुपारी मुलगी पसंत पडली अन् चक्क सायंकाळी चक्क शरबताच्या ग्लासावर लग्न आटोपून वधूच्या कुटुंबीयांनी बिदयागी दिली. जवळच्या कुटुंबीयांना भ्रमणध्वनीवरून व्हिडीओ कॉलींगवर हा अगळावेगळा विवाह सोहळा लाईव्ह करण्यात आला.
हेही वाचा: जळगाव : माहेरवाशिणीचा हुंड्यासाठी छ्ळ; गुन्हा दाखल
Web Title: Unique Marriage In Jalgaon City News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..