Latest Marathi News | पाणीयोजनेचे पावणेदोन कोटी ‘कोरड्या विहिरीत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water Shortage

Jalgaon Water Shortage : पाणीयोजनेचे पावणेदोन कोटी ‘कोरड्या विहिरीत’

जळगाव : एरंडोल तालुक्यातील तळई गावात विहिरीत थेंबभरही पाणी नसताना त्यावर पाणीयोजना साकारल्यामुळे सुमारे पावणेदोन कोटींचा खर्च अक्षरश: वाया गेला आहे. २०१५ मध्ये उद्‌घाटन झाल्यानंतर एकदाही या योजनेद्वारे पाणीपुरवठा झाला नसून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(wastage of water scheme no water available in well jalgaon latest news)

हेही वाचा: Shardiya Navratri Jalgaon : इंद्रदेवजी नगरात महिलांच्या पुढाकाराने दुर्गोत्सव

या संदर्भात तळई (ता. एरंडोल) येथील दोनशेवर नागरिकांच्या सह्यांचे निवेदन ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सीईओ डॉ. पंकज आशिया यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, की तळई गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा विभागाने खडकेसीम (ता. एरंडोल) शिवारातील पाणी नसलेली विहीर एक लाख ९० हजारांत खरेदी केली. त्यावर पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केली.

अन्य यंत्रणांना हाताशी धरून मर्जीतील ठेकेदारास काम देण्यात आले. ठेकेदाराने या कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले. योजनेवर एकूण एक कोटी ७४ लाख ६२ हजार ८०० एवढा खर्च झाला असून, पाणी नसल्याने ही संपूर्ण योजनाच ‘फेल’ ठरली आहे.

हेही वाचा: Jalgaon : रस्त्यासाठी पालकमंत्र्यांचा सहभाग

उद्‌घाटनाला टँकरने पाणी

२०१५ मध्ये या पाणीपुरवठा योजनेचे उद्‌घाटन तत्कालीन माजी व आताचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील व तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी विहिरीत पाणी नसल्याने टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले व पाणीयोजनेचे उद्‌घाटन झाले.

हा सर्व प्रकार या योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार दर्शविणारा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित करून योजनेवर झालेल्या खर्चाची वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

चिमणरावांनीही केली चौकशीची मागणी

दरम्यान, या योजनेतील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण आमदार चिमणराव पाटलांना समजल्यानंतर त्यांनीही निवेदन देऊन या योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे.

हेही वाचा: Jalgaon Cyber Crime : Online Diwali Offersने काढले दिवाळं तरुणीला २९ हजारांना गंडविले