250 वेळा ‘शूटआउट’ बघून ‘मायागँग’ची स्थापना, पोलिसांनी केला पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

250 वेळा ‘शूटआउट’ बघून ‘मायागँग’ची स्थापना, पोलिसांनी केला पर्दाफाशc

250 वेळा ‘शूटआउट’ बघून ‘मायागँग’ची स्थापना, पोलिसांनी केला पर्दाफाश

जळगाव : शहरातील चौघुले प्लॉट भागात रविवारी (ता. २०) रात्री घडलेल्या सलून व्यावसायिकाच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यात एकाचे गुन्हेगारी नाव ‘छोटा माया’ असे आहे. जबरी चोरी, खंडणी, हाणामारी, लुटीचे अनेक गुन्हे या टोळीवर दाखल असून अटक करुनही कायदा त्यांचे काहीच बिघडवू शकत नसल्याची पक्की धारणा झाल्याने ही विधीसंघर्षित गँग मोकाट आहे.

ट्रीपल सीट दुचाकीवर हिंडून सहज मोबाईल हिसकावणे, चाकू लावून पैसे हिसकावणे, खंडणी मागणे, मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या जळगाव शहरातील ‘माया टोळी’चा पोलिसांनी पर्दाफाश केला. अल्पवयीन संशयितांना पकडून त्यांना बाल न्याय मंडळासमक्ष हजर करून बालनिरीक्षणगृहातही ठेवण्यात आले. मात्र, उपयोग शून्य.

हेही वाचा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी 'या' नेत्याच्या नावाची चर्चा

कायदाही ठरला खुजा

आपले उपद्रवमूल्य निरीक्षण गृहातही सिद्ध करून इतर विधीसंघर्षित बालकांच्या सुरक्षेसाठी या संशयितांना नाइलाजास्तव सोडावे लागले. आणि इथेच कायदा खुजा पडल्याचे या माया टोळीने सुनील टेमकर या कुटुंब प्रमुखाचा खून करून पुन्हा सिद्ध केलेय. तिघांना खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेत त्यातून चॉपर चालवणाऱ्या एकाच संशयितास ताब्यात घेत बाल न्यायालयात हजर करण्यात आले. इतर दोघांना सोडून देण्यात आले. ताब्यातील ‘छोटा माया’ (गुन्हेगारी टोपन नाव) नामक संशयितास बालनिरीक्षण गृहात पाठवण्यात येणार असल्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी सांगितले.

चित्रपटाचा प्रभाव

माया गँगचा म्होरक्या सतरा वर्षांचा असून, त्याची परिसरात प्रचंड दहशत आहे. अपूर्वा लाखिया दिग्दर्शित चित्रपट ‘शूट आउट ॲट लोखंडवाला’ सलग अडीचशे वेळा बघितल्याने चित्रपटातील हिरो (विवेक ओबेरॉय) सारखे कपडे, केशरचना, हातात कडे, बोलण्याची ढब तशीच, गल्लीत व परिसरात दांडगाई करत असल्याने त्याचे नावच ‘माया भाई’ ठेवले गेले. त्याचे अनुकरण करणाऱ्या साथीदाराचे नाव छोटा माया.. या दोघांच्या व्यतिरिक्त इतरही त्यांचे साथीदार आहेत.

बाँडच्या नशेने ‘जेम्स बाँड’

पंक्चर जोडण्यासाठी वापरातील फेव्हिस्टिकसारखे बाँड ओढण्याची या गँगला नशा असून, रोज अडीचशे रुपयांत २२ नग बाँडचा एक बॉक्स खरेदी करून एकाच वेळी ओढला जातो. त्याच्या नशेत गुन्हे करून रात्रभर ते नशेत राहतात. सकाळी उठल्यावर छातीत वेदना होतात, किडण्या दुखतात, परत सायंकाळची वाट पाहून नशा ओढल्यावर तोच आपला धंदा असेही निर्लज्जपणे तिघे माहिती देताना सांगतात.

loading image
go to top