चौथा पती गळ्यात माळ टाकणार तोच...चतुर्भुज विवाहितेचा सिनेस्टाईल प्रताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

चौथा पती गळ्यात माळ टाकणार तोच...चतुर्भुज विवाहितेचा सिनेस्टाईल प्रताप

पाचोरा (जि. जळगाव) : येथील पप्पू पाटील यांच्याशी विवाह करून अवघ्या तीन महिन्यात सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज घेऊन चतुर्भुज झालेल्या विवाहितेला चौथे लग्न करताना पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्याकडून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, असा हा प्रकार पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

2 लाख २७ हजारांंचा ऐवज चोरला

येथील पप्पू पाटील यांचा विवाह जानेवारीत अनिता पारशी (रा. भामना -मध्य प्रदेश) या २६ वर्षीय युवतीशी झाला होता. लग्नानंतर एक-दोन वेळा ती माहेरी देखील जाऊन आली. परंतु १५ एप्रिलला कोणालाही काहीही न सांगता ती घरातून निघून गेली. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, साड्या असा दोन लाख २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पप्पू पाटील यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर या विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्धार केला. उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास पाटील, पोलिस हवालदार विनोद पाटील, महिला पोलिस शारदा भावसार, मनोहर पाटील यांचे पथक तयार करण्यात आले. त्यानंतर या पथकाने संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत विवाहितेस ताब्यात घेतले.

हेही वाचा: Jalgaon : 2 मुलांच्या आईने अखेर मृत्युला कवटाळले

चौथा पती गळ्यात माळ टाकणार, तोच...

पोलिस पथकाने चतुर्भुज झालेल्या विवाहितेच्या मोबाईलचे लोकेशन मिळवत मध्य प्रदेश गाठले. तिचे नातलग रामसिंग पठाण (रा. धामणे -मध्यप्रदेश) व बादशा पावरा (पाचोरा) यांचेही मोबाईल लोकेशन मिळवत ही विवाहिता घाटनांद्रा (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथे असल्याचे कळाले. पोलिस पथक तेथे धडकले असता पाचोरा येथून तिसऱ्या लग्नानंतर चतुर्भुज झालेली अनिता चौथे लग्न करण्यासाठी बोहल्यावर चढताना आढळून आली. चौथा पती गळ्यात माळ टाकणार तोच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व पाचोरा येथे आणले. तिच्याकडून दोन लाख २७ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. पोलिस कर्मचारी विनोद पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा: ''पिंटूमामाने घरात बोलावून केले असे...'' अल्पवयीनने मांडला घटनाक्रम

Web Title: Woman Arrested For Cheating On Marriage Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top