
Jalgaon Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी (ता. ८ ) रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिला दोन मुलींसह वास्तव्यास आहे. तिच्या पतीचे २००५ मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे ही महिला घरगुती मेस चालवून आणि लेडीज गारमेंट्सचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.
मेसमध्ये जेवणाचा डबा लावण्याच्या बहाण्याने श्रीकृष्ण तुकाराम मेगंडे (वय ४०, रा. अयोध्यानगर) आला. महिलेशी ओळख झाली. संशयित श्रीकृष्ण मेगंडे याने २३ मार्च २०१७ ते ३० मे २०१९ दरम्यान सतत संपर्क वाढवून महिलेला लग्न करण्याचे वचन दिले.
संशयित मेडंगे याने जबरदस्ती अत्याचार केला. काहींना काही कारण सांगून संशयिताने महिलेकडून १९ लाख १० हजार रुपये उकळले आहेत. पैसे घेण्यापुरते चांगल वागत असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुरवातीला पीडितेने पोलिसांत धाव घेतली.
मात्र, पोलिसांनी दाद पुकारा न घेतल्याने पीडितेने न्यायालयात दाद मागितली. अखेर बुधवारी न्यायालयाच्या आदेशानुसार रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित श्रीकृष्ण तुकाराम मेगंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख तपास करीत आहेत.