Shiv Jayanti 2023 : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीमध्ये आता ‘महिलाराज’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chhatrapati shivaji maharaj jayanti

Shiv Jayanti 2023 : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीमध्ये आता ‘महिलाराज’

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीत दर वर्षी पुरुषांचा पुढाकार असतो. यंदा मात्र महोत्सवासाठी महिला पदाधिकारी एकत्र येऊन महिलांच्या नेतृत्वाखाली

यंदाचा महोत्सव होणार असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा साधना महाजन (Sadhana Mahajan) यांनी शनिवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली. (Women office bearers come together for shiv jayanti festival This year Led by women jalgaon news)

शहरातून भव्य शोभायात्रा, पुरुषांची मोटारसायकल रॅली, कपल रॅली, महिलांची स्कूटर रॅली, किल्ले बनवा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर महिलांतर्फे हा महोत्सव साजरा होईल.

शिवजयंती सर्वसमावेशक करून सामाजिक सौंदर्य, एकमेकांविषयी प्रेम आणि यामधून निष्पन्न समाज उभारणीचा प्रयत्न शिवजयंतीच्या माध्यमातून केला जातो.

स्वागताध्यक्षा संजना पाटील, लीनाताई पवार, संजना पाटील, माजी महापौर सीमा भोळे, रजनी चव्हाण, नाट्य कलावंत शंभू पाटील आदी उपस्थित होते.

यंदा महोत्सव समितीने छत्रपती शिवरायांच्या संदर्भात शालेय मुलांमध्ये जागृती, आपल्या इतिहासाची माहिती व आपल्या परंपराची ओळख म्हणून ‘शिवविचार परीक्षा’ आयोजित केलेली आहे. शिवविचार परीक्षा दोन स्तरावरती घेण्यात येणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मराठी, इंग्रजी व ऊर्दू अशा तीनही भाषांमध्ये ही स्पर्धा होईल. प्रत्येक शाळेतून तीन मुले निवडून एक अंतिम स्पर्धा घेऊन मुलांना बक्षिसे व पुस्तके देण्यात येणार आहे. ही परीक्षा जळगाव, जामनेर तालुक्यात होईल.

चित्रकला व रंगभरण स्पर्धा १८ फेब्रुवारीस सकाळी आठला महात्मा गांधी उद्यान, बसस्थानक शेजारी घेण्यात येणार आहे. पहिली ते दहावी या शालेय गटासाठी चार विभागांमधून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कला अध्यापक संघाचे सहकार्य राहील.

मुलांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे सहकार्य लाभले आहे. १९ फेब्रुवारीस सकाळी आठला भव्य शोभा यात्रेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून केलेले आहे.

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे उपक्रम शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत सुरू राहतील. यात महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती संभाजीराजे जयंती या निमित्ताने व्याख्यानमाला, कीर्तन, पोवाडे यांचे आयोजन केले आहे.

शिवाजी महाराजांची कवड्यांची माळ

राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नित्यनेमाने व श्रद्धापूर्वक आपल्या गळ्यात घालत असलेली कवड्यांची माळ जळगावकरांच्या दर्शनासाठी शहरात आणण्यात येईल. शिवजयंतीला शिवर्तीथावर सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत दिव्य माळेचे दर्शन घेता येणार आहे.

ही दिव्य राजमाळ कोंडाणा किल्ला जिंकल्यावर नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे पार्थिव राजगडावर आणल्यावर महाराजांनी त्यांच्या पार्थिवावर अर्पण केली होती. जळगावकरांच्या दर्शनासाठी तान्हाजी मालुसरे यांच्या १२ व्या वंशज डॉ. शीतल मालुसरे ती माळ घेऊन येणार आहेत.

आज एकत्र कुटुंब रॅली

यंदापासून एकत्र कुटुंब रॅलीची संकल्पना राबविण्यात येत आहे. रविवारी (ता. १२) दुपारी चारला छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथून रॅली निघणार आहे. सर्व शिवप्रेमींनी रॅलीत आपल्या कुटुंबासह एकत्र सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Shiv JayantiJalgaonwomen