लेकीच्या लग्नातील पैसे दुष्काळग्रस्तांना 

अतुल पाटील
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

आमटे परिवारातील इंजिनिअर झालेल्या लेकीचे लग्न शुक्रवारी (ता. 15) झाले. यावेळी लग्नातील अतिरिक्‍त खर्च टाळत तो पैसा त्यांनी 'सकाळ रिलीफ फंड'कडे सुपूर्द केला आहे.

औरंगाबाद - आमटे परिवारातील इंजिनिअर झालेल्या लेकीचे लग्न शुक्रवारी (ता. 15) झाले. यावेळी लग्नातील अतिरिक्‍त खर्च टाळत तो पैसा त्यांनी 'सकाळ रिलीफ फंड'कडे सुपूर्द केला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी फंडाकडे पैसे दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या उपक्रमाचे वऱ्हाडी मंडळींनी कौतुक केले. 

लग्न म्हटले, की वऱ्हाडी मंडळींना हार, तुरे, टोपी, शाल, श्रीफळ आलेच. त्या खर्चाला फाटा देण्याचे काम मुलीचे वडील विष्णू आमटे यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करीत वधू-वरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर विधी टाळत साध्या पद्धतीने लग्न झाले. तत्पूर्वी पाच हजार रुपयांचा धनादेश मीरा आमटे आणि विष्णू आमटे यांनी "सकाळ रिलीफ फंडा'कडे सुपूर्द केला. 

आमटे परिवारातील गिरणी कामगारांची मुलगी मनीषा ही मेकॅनिकल इंजिनिअर आहे. ते मूळचे खांडेपारगाव (ता. जि. बीड) येथील असून, सध्या हडको परिसरात राहत आहेत. मुलगा जातेगाव (ता. जामखेड, जि. नगर) येथील आहे. तोही एमटेक आहे. यावेळी सुरेश वाकडे, अभिजित देशमुख, सतीश वेताळ, रमशे आमटे, अशोक आमटे, बबन आमटे, चंद्रसेन घोडके, दिलीप गायकवाड, आशा गायकवाड यांची उपस्थिती होती. 
 

कृषी क्षेत्रात काम करत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी माहित आहेत. या माध्यमातून अतिरिक्‍त खर्च टाळण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांसाठी "सकाळ' चांगले उपक्रम राबवत असते. 
- हरीष आमटे, मुलीचा भाऊ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial assistance for helping drought-affected farmers