ग्लोबल वॉर्मिंगसाठी सायकल मोहीम

रश्‍मी पाटील - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 9 जानेवारी 2017

गावा-गावांतील शाळांत जाऊन मुलांना ग्लोबल वॉर्मिंगबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने विक्रांत कर्णिक यांनी तीन राज्यांतून सायकल प्रवासाला सुरुवात केली आहे. 

45 दिवसांत सायकलवरून दीड हजार किलोमीटरचा प्रवास 

ठाणे - ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. याबाबत जनजागृतीच्या उद्देशाने ठाण्यातील एका अवलीया "तरुणा'ने तीन राज्यांत सायकल मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला शनिवारपासून सुरुवात झाली. विक्रांत कर्णिक (वय 60) असे त्यांचे नाव आहे. 

दिवसागणिक वाढत चाललेल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवरील तापमानात चढ-उतार होत आहे. त्याचे विपरीत परिणाम हळूहळू जाणवू लागले आहेत. याबाबत खूप चर्चा होत असली तरी नेमके उपाय अजूनही केले जात नाहीत. पुढच्या पिढीमध्ये ग्लोबल वॉर्मिंगबाबत सजगता निर्माण होण्याच्या उद्देशाने विक्रांत कर्णिक यांनी जागृती करण्याचा ध्यास घेत शनिवारपासून सायकलवरून तीन राज्यांमध्ये भ्रमंती सुरू केली आहे. 45 दिवसांमध्ये ते महाराष्ट्र, मध्य प्रदेश व दिल्ली असा प्रवास करणार असून, सुमारे 1500 किमीचे अंतर सायकलवरून पार करणार आहेत. या प्रवासात कर्णिक गावागावांतील नागरिकांना, तिथल्या शाळांत जाऊन मुलांना ग्लोबल वॉर्मिंगविषयी व्याख्याने, लघुचित्रपटांद्वारे जनजागृती करणार आहेत. 

जागतिक तापमान वाढते आहे. दर वर्षी तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढत आहे. पुढील आठ-दहा वर्षांत तापमान वाढीची अशी परिस्थिती होईल की आपल्याला त्यावर काही उपाय करता येणार नाहीत. निसर्गाचे चक्र का विसकटत चालले आहे, ते सुरळीत चालू राहण्यासाठी काय करायला हवे, याची माहिती या सायकल प्रवासावेळी देणार आहे. 
- विक्रांत कर्णिक 

Web Title: cycle for global warming