शहापुरात दारू सोडलेल्यांचा सपत्नीक सत्कार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

दारूपासून परावृत्त झालेल्यांचा सपत्नीक सत्कार करताना संदीप बाबर व ग्रामस्थ. 
 

मसूर ः दारूमुळे उद्‌ध्वस्त होत असलेले संसार सावरण्याचा वसा शहापूर (ता. कऱ्हाड) येथील संदीप बाबर यांनी घेतला असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे दोघांनी दारू सोडली असून, या दोघांचा सपत्नीक नुकताच संदीप बाबर यांच्यासह शहापूर गावाने सत्कार केला. 

शहापूरच्या संदीप धोंडिराम बाबर या युवा कार्यकर्त्याने गतवर्षी 15 ऑगस्ट 2018 रोजी गावच्या ग्रामसभेत आगामी वर्षात जो कोणी दारू पिण्यापासून परावृत्त होईल, त्याचा एक वर्षानंतर गावासमोर शाल-श्रीफळ देऊन सपत्नीक संपूर्ण पोषाख करून सत्कार करण्याची घोषणा केली होती. तसेच दारूचे दुष्परिणामही सांगितले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत गावातील बाळासाहेब मारुती जाधव व तात्यासाहेब राजाराम आडके या दोघांनी 
वर्षभर दारू सोडतानाच कायमचे दारूपासून परावृत्त होण्याचा निर्णय घेतला अन्‌ तो पाळलाही. गावात नुकत्याच झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमात या दोघांचा सपत्नीक पोशाख देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

दारूपासून परावृत्त झालेल्यांना समाजात मानसन्मान मिळतो. आयुष्यात खूप पैसा कमावला. मात्र, दारूच्या व्यसनामुळे पैशाची अजिबात बचत करता आली नाही. सामाजिक कार्यकर्ते संदीप बाबर यांनी केलेल्या आवाहनानुसार एक वर्षभर दारू सोडण्याचा निर्णय घेतला. एका वर्षात पैशाची बचत तर झालीच. घरगुती वातावरण चांगले होण्याबरोबरच समाजाचाही बघण्याचा दृष्टिकोन बदलला. समाजात पूर्वीपेक्षा मानसन्मान मिळू लागला आहे, अशी प्रतिक्रिया दारूपासून परावृत्त झालेल्यांनी दिली. व्यसनापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी युवक वर्गाला दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those who left alcohol were recently felicitated