esakal | विद्यार्थ्यांनी टाकाऊतून केली पक्ष्यांच्या चारा-पाण्याची सोय 
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी टाकाऊतून केली पक्ष्यांच्या चारा-पाण्याची सोय 

विद्यार्थ्यांनी टाकाऊतून केली पक्ष्यांच्या चारा-पाण्याची सोय 

sakal_logo
By
दीपक खैरनार -सकाळ वृत्तसेवा

अंबासन - माळीनगर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी पक्षी वाचवा अभियानांतर्गत शाळा परिसरातील झाडांवर डबे टांगून त्यात पाणी टाकून पक्षी वाचविण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. छोटे डबे, बाटलीचा खालचा भाग कापून वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांना कल्पक बुद्धीने दोऱ्या बांधल्या. काहींनी तर प्लास्टिकचे डबे आणले. दोनच दिवसांत शाळेत मुलांची व बाहेर पक्ष्यांची शाळा भरल्याचे दिसून आले. 

चिमण्यांविषयी असलेला जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा आणि चिमण्यांचे अस्तित्व टिकून राहावे, असा निर्धार माळीनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी केला. प्रत्येक विद्यार्थ्याने घरात टाकाऊ असलेले प्लास्टिकचे डबे, धान्य जमा करून, शाळेच्या पटांगणातील झाडांना दोरीने बांधले. त्या भांड्यात पाणी, धान्य टाकून चिमण्यांच्या चारा-पाण्याची सोय केली. उन्हाळ्यात या भांड्यात चारा-पाणी टाकण्याची जबाबदारी या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरीही पक्ष्यांना पाण्याची सोय केली आहे. तंत्रज्ञानासह विद्यार्थ्यांना रचनावादी बनविण्यासाठी तंत्रस्नेही रचनावाद विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात माळीनगर शाळा यशस्वी ठरली आहे. मुख्याध्यापक राजेंद्र बधान व उपशिक्षक भरत पाटील शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीही करीत आहे. 

विद्यार्थी, शाळेपुरताच हा उपक्रम मर्यादित न राहता पर्यावरणीय संदेश देण्याची भूमिकाही पार पाडत आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रमोद रौंदळ, प्रथमेश बागूल, हर्शल रौंदळ, दर्शना भालेराव, निशा रौंदळ, पूजा रौंदळ या उपक्रमाचे नेतृत्व करीत आहेत. 

विद्यार्थ्यांना परिसरातील पशूपक्ष्यांची माहिती व्हावी, परिसर अभ्यास हा परिसरातूनच व्हावा, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, भूतदया ही मूल्ये रुजण्यास या उपक्रमामुळे शक्‍य होते. परिसरातील सर्व घटकांनी पक्षी वाचवा या उपक्रमात सहभागी व्हावे व पर्यावरणाचे रक्षण करावे. 
- भरत पाटील, उपशिक्षक, माळीनगर 

loading image