शिशूसह गर्भवतीला मिळाले जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

...माता अनुभवणार मातृसुख  
डॉक्‍टरांनी शस्त्रकिया केली. यशस्वी झाली. परंतु, गर्भवती मातेच्या ‘बाळा’ला वाचवण्याचे  आव्हान पुढे आले. त्यात डॉक्‍टरांना त्या मातेने इच्छाशक्तीही बोलून दाखवली. माझा जीव घ्या, परंतु लेकराला वाचवा हो...हे त्या मातेचे शब्द डॉक्‍टरांना वारंवार आठवत होते. यामुळेच डॉक्‍टरांनी अतिशय शर्थीचे प्रयत्न केले. मातेनेही तब्बल २६ दिवस डॉक्‍टरांच्या प्रामाणिक प्रयत्नांना सकारात्मक साथ दिली. व्हेंटिलेटवर असलेल्या गर्भवती मातेचे आणि गर्भातील लेकराचे नशीब बलवत्तर म्हणूनच माय आणि होणारे लेकरू मृत्यूच्या दाढेतून आता परतले आहेत. आज सोमवार (ता.१) ट्रॉमा युनिटमधून सुटी देण्यात आली. आगामी महिन्यात ती एका बाळाला जन्म देईल. तिचे बाळंतपणही सुखरूप होईल, असा विश्‍वास डॉ. फैजल यांनी बोलून दाखवला.

नागपूर - फुलं विकून गुजराण करणारे कुटुंब. पत्नी सात महिन्यांची गर्भवती. आई  होण्याचा आनंद ती अनुभव होती. परंतु, यांच्या गोड संसाराला कोणाची नजर लागली कोण जाणे...दुचाकीने झालेल्या अपघातामध्ये गर्भवती मातेच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गर्भात नवा अंकुर जन्माला येण्याचा काळ जवळ येत होता, तर आईचा श्‍वास बंद होण्याची वेळ येईल, अशी बिकट अवस्था निर्माण झाली होती. परंतु, मेडिकलच्या ट्रॉमा युनिटमधील डॉक्‍टर गर्भातील बाळासह त्या मातेलाही देवदूत बनून आले. महिनाभराच्या उपचारानंतर दोघांनाही जीवनदान दिले. सध्या गर्भातील बाळ आणि माता सुरक्षित आहेत.

मागील महिनाभरापासून मेडिकलमधील ट्रॉमा युनिटमध्ये त्या महिलेवर उपचार सुरू आहेत. छोटा ताजबाग परिसरात राहात असलेली पंचविशीतील मोनिका लांडगे असे या महिलेचे नाव. सहा मार्च रोजी अपघात झाला. डोक्‍याला जखम झाली. डोक्‍याच्या कवटीला गंभीर जखम झाली. नातेवाइकांनी ट्रॉमा युनिटमध्ये दाखल केले. महिलेची परिस्थिती बघून ट्रॉमा युनिटचे प्रमुख डॉ. मोहम्मद फैसल यांनी तत्काळ आवश्‍यक चाचण्या केल्या. डोक्‍याला जबर दुखापत झाल्याचे निदान झाले. गर्भवती माता आणि बाळ या दोघांचाही जीव वाचवायचा असेल तर अवघ्या चार तासांत शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते.

गर्भवती असल्याने दुहेरी जोखीम होती. क्षणाचाही विलंब न करता डॉ. फैजल यांनी मेंदूरोग शल्यचिकित्सक डॉ. पवित्र पटनायक, भूलतज्ज्ञ डॉ. सोना चाम यांच्या सहकार्यातून शल्यक्रिया केली.मेंदूवर सूज असल्याने शस्त्रक्रियेदरम्यान डोक्‍यावर असलेल्या हाडांचा काही भाग काढून ठेवला आहे. तो लावण्यात येईल.

मेडिकल, ट्रॉमा युनिटमध्ये उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी येथील प्रत्येक डॉक्‍टर प्रयत्नशील असतो. शेवटच्या श्‍वासापर्यंत डॉक्‍टर शर्थीचे प्रयत्न करतात. या महिलेचे गर्भातील बाळ आणि महिला दोघांनाही वाचवण्यात यश आले. डॉ. फैजल, डॉ. पटनाईक यांच्यासह साऱ्यांचे सामूहिक यश आहे.
- डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.

Web Title: Accident Pregnant Women Delivery Baby Life Saving