छोट्या विमानांतूनच विस्तारेल सेवेचे जाळे - कॅप्टन यादव

राजेश पाटील
मंगळवार, 17 एप्रिल 2018

स्वदेशी विमाननिर्मितीची आणि या सेवेच्या ग्रामीण भागातील विस्ताराची प्रतीक्षा लवकर संपण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी सकारात्मक राहण्याची गरज आहे.
- अमोल यादव, कॅप्टन

ढेबेवाडी - छोट्या विमानांची सेवा विस्तारल्याशिवाय त्या क्षेत्राच्या विकासाची भाषाचं आपण करू शकत नाही. शहरांबरोबरच गावे- वाड्यावस्त्या विमानाने जोडायच्या असतील तर छोट्या विमानांना पर्याय नाही. राज्यकर्त्यांकडे त्याबाबत सकारात्मकता आहे. मात्र, सरकारी बाबूंची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत भारतीय बनावटीचे पहिले विमान बनविणारे कॅप्टन अमोल यादव यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

इंग्रज राजवटीत छोट्या विमानांची सेवा विस्तारली होती. मात्र, नंतरच्या काळात त्या सेवेचा बागुलबुवा करत फक्त मोठ्या विमानांवर भिस्त वाढविण्यात आली; परंतु जिथे वडापची गरज आहे तिथे मर्सिडीज पाठवून काय उपयोग? असा प्रश्‍न उपस्थित करून कॅप्टन यादव म्हणाले, ‘‘मोठ्या विमानांना पुरेसे प्रवासी मिळेनासे झाल्यावर त्यातील सिटस्‌ मोकळ्या पडून हळूहळू ती सेवाच बंद होते. त्यावर छोट्या विमानांचा पर्याय उत्तम आहे. इंग्रजांनीही दूरदृष्टीने ते हेरले होते. सध्या विमानतळे विस्तारत असली तरी जुन्या काळातील विमानतळांचाही सक्षमपणे विकास होऊन तेथील विमानसेवा गतिमान करायला पाहिजे. त्यासाठी छोट्या विमानांशिवाय पर्याय नाही. यामध्ये राजकारणी मंडळींकडे व्हीजन असले तरी अधिकाऱ्यांची नकारात्मकता आडवी येत असल्याने अडचणी उभ्या राहतात. अशा विमानसेवेसाठी सिक्‍युरिटी क्‍लिअरन्सचा बाऊ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडून काही तरी भीतीदायक ऐकून प्रसंगी मंत्रीही चार पावले मागे सरकतात, हे वास्तव आहे.’’ 

विमानसेवा गतिमान करण्यासाठी लागणारी वैमानिक, इंजिनिअर्सची मोठी टीम आणि विमानतळेही पडून आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये विमानसेवा बऱ्यापैकी विस्तारली आहे. ग्रामीण भागातील जनतेचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची मानसिकता बदलायला पाहिजे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत छोटी विमाने राहिली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर १९ आसनी विमाननिर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता साकारायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यामध्ये खास लक्ष घातले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aeroplane making by amol yadav motivation