#WednesdayMotivation सहा बंधू, सव्वीस सदस्यीय कुटुंब शेतशिवारात दंग!

बाळासाहेब लोणे 
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

ठोक्‍याने शेती 
वर्ष २०१५ पूर्वी कोरडवाहू शेतीतून जास्त उत्पन्न होत नव्हते. तेव्हा लगड कुटुंबाने जामगाव, बगडी शिवारात जमीन ठोक्‍याने घेऊन शेती केली. २०१६ मध्ये अशाच एका शेतात कांदा लागवड केली. तेव्हा साडेसहा हजारांचा भाव मिळाला. यातून मिळालेल्या उत्पन्नातून पाइपलाइनचा मार्ग सुकर झाला.

गंगापूर - एक विचाराने चालणाऱ्या सहा भावांच्या सव्वीस सदस्य असलेल्या एकत्र कुटुंबाने सततच्या दुष्काळावर मात करीत शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. शहरालगतच्या सुमारे पंधरा एकर क्षेत्रात लगड कुटुंबाने विविध प्रयोग करीत नंदनवन फुलविले आहे. परिसरात कोणीही घेत नसलेले केळीचे पीक तर या कुटुंबीयाने घेतलेच; पण त्याची काढणी करणे, ते पिकविणे व विक्री करणे ही सर्व कामे कुटुंबातील सदस्यच करतात. यावर्षी त्यांनी दीड एकर क्षेत्रात केळीचे उत्पन्न घेतले. याशिवाय व्यवस्थित नियोजन करून अद्रक, कांदा, ऊस, मका आदी पिके घेऊन चांगले उत्पन्न मिळविले आहे.

लगड कुटुंबाने पंचवीस लाख रुपये खर्च करून सात किलोमीटरवर असलेल्या गोदावरी नदीतून पाइपलाइन टाकून शेतात पाणी खेळविले आहे. ‘इच्छा तेथे मार्ग’ या म्हणीनुसार त्यांनी प्राप्त परिस्थितीवर मात करून दुष्काळात शेती फुलविली आहे. लगड यांच्या सहा भावांच्या एकत्रित कुटुंबातील दोन भाऊ गॅरेज चालवतात, तर इतर चौघे शेतात राबतात. यातील मच्छिंद्र हे मोठे, तर अनिल, सुनील, किशोर, ज्ञानेश्वर व कैलास लहान भाऊ आहेत. सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या असल्याने कामाची पद्धती सुलभ झाली आहे. घरच्या महिला, मुलेदेखील शेतीकामात मदत करतात. त्यामुळे मजुरांची गरज पडत नाही. सहाही भावांचे विवाह झाले आहेत. 

कुटुंबातील मुलांसह सदस्यसंख्या २६ आहे. घरातील मोठ्या मुलाच्या मुलीचे लग्न झाले आहे. कुटुंबाकडे दहा म्हशी आहेत. दररोज वीस लिटर दूध डेअरीला जाते. पूर्वी वडिलोपार्जीत दहा एकर शेती होती. सहा भावंडांनी एक विचार, कष्ट, जिद्दीच्या बळावर वडिलोपार्जीत दहा एकर शेतीमध्ये आणखी पाच एकरांची भर घालत शेती पंधरा एकरांवर नेली आहे.

जे कुटुंब स्वत: शेतीत राबते, त्याचीच शेती फायद्याची ठरू शकते, यावर आम्हा भावंडांचा विश्वास आहे. एकत्रित कुटुंब, सहाही भावंडांचा एकविचार, काटकसरीपणा यातून शेतीच्या माध्यमातून आर्थिक विकास करीत आहोत. सर्वांची कामे ठरली आहेत. कामाची विभागणी केल्याने काम वेळेत पूर्ण होते. एखाद्याला कामात अडचण आली तर दुसरा कोणीतरी तयारच असतो. त्यामुळे कामाचा कधीच खोळंबा होत नाही.  
- मच्छिंद्र लगड (थोरला भाऊ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture lagad Family Economic Growth Success Motivation