पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथ

पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथ

कोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद विठ्ठल सोळंके यांनी  शेतीला पशुपालनाची जोड दिली. या व्यवसायातून अपेक्षित आर्थिक नफा आणि शेतीसाठी पुरेसे शेणखत मिळते. शेती विकासाच्या बरोबरीने येत्या काळात दूध डेअरी आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाचे त्यांनी नियोजन केले आहे. 

कोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) गावशिवार तापी नदीकाठी आहे. केळीसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. काळी कसदार, पाण्याचा निचरा होणारी जमीन या भागात आहे. कूपनलिकांना पुरेसे पाणी असल्याने परिसरातील शेती बारमाही हिरवेगार असते. याच गाव शिवारात देवानंद सोळंके यांची वडिलोपार्जित २८ एकर जमीन आहे. शेतात दोन कूपनलिका आहेत. साधारणपणे २८ एकरापैकी सुमारे १० एकर जमीन त्यांनी लागवडीखाली आणली आहे. उर्वरित जमीन टेकड्या, झुडपांमुळे पडीक आहे. दहा एकर जमीन त्यांनी यंत्रणेच्या साह्याने सपाट करून लागवडयोग्य बनविली. त्यासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागला होता.

शेतीला पशुपालनाची जोड 
देवानंद यांचे वडील विठ्ठल हे पूर्वीपासून दूध व्यवसायामध्ये होते. गाव तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून ते दूध संकलन करायचे. घरच्या म्हशी नसताना देखील त्यांनी चांगल्या प्रकारे दुग्ध व्यवसाय केला. त्या वेळेस तापी नदीवर पूल नव्हता. नदी पार करून सायकलने जळगाव शहरातील डेअरीमध्ये दूध द्यायला ते जायचे. तसेच सायकलने फैजपूर (ता. यावल) येथेही दूध विक्रीसाठी जायचे. या व्यवसायात बऱ्यापैकी नफा राहायचा. वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय पुढे देवानंद यांनी हाती घेतला. घरी दुधाळ गाई, म्हशींचे संगोपन न करता आजूबाजूच्या डांभुर्णी, विदगाव आदी गावांमधून दूध संकलन त्यांनी सुरू केले. दररोजचे ४०० लिटर दूध संकलन केल्यानंतर त्याचे वितरण जळगाव शहर आणि लगतच्या गावात केले जायचे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देवानंद यांचे बंधू योगेश हे कृषी सहायक झाले. सध्या ते ठाणे जिल्ह्यात  कार्यरत आहे. बंधू नोकरीला लागल्यानंतर देवानंद यांनाही कृषी विभागांतर्गत कीड- रोग सर्वेक्षकाची नोकरी मिळाली. या नोकरीमुळे दूध संकलन, वितरण व विक्रीचा व्यवसाय त्यांनी बंद केला. पण नोकरीत त्यांचे मन रमले नाही. त्यामुळे नोकरी सोडून त्यांनी पुन्हा दूध व्यवसाय सुरू केला. या वेळेस त्यांनी केवळ दूध संकलन करता घरच्या गोठ्यामध्ये दुधाळ म्हशींच्या संगोपनाचा निर्णय घेतला. 

जमीन सुपीकतेवर भर 
पशुपालनामुळे देवानंद यांना शेतीसाठी पुरेसे शेणखत उपलब्ध होते. सुपीकता जपण्यासाठी केळी, कपाशी लागवडीपुर्वी दरवर्षी पुरेसे शेणखत जमिनीत मिसळले जाते. दरवर्षी १५० ट्रॉली शेणखत मिळते. यातील ५० ट्रॉली शेणखताची २२०० रुपये प्रति ट्रॉली या दराने विक्री केली जाते. उरलेले १०० ट्रॉल्या शेणखत स्वतःच्या शेतीमध्ये वापरले जाते. यामुळे जमीन सुपीक झाली, त्याचबरोबरीने कापूस, केळीचेही अपेक्षित उत्पादन मिळते.  शेतीच्या व्यवस्थापनासाठी दयानंद यांच्याकडे ट्रॅक्टर, बैलजोडी आहे. तसेच चार मजूर आहेत. दरवर्षी फेब्रुवारीत तीन एकरांत केळीची लागवड असते. केळीची २२ किलोची रास मिळते. पूर्वहंगामी कापसाची चार एकरांत लागवड असते. कापसाचे एकरी १३ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. कापूस, केळीला ठिबक सिंचन केले आहे. यंदा अतिपाऊस व गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकता एक ते दीड क्विंटलने कमी झाली आहे. बोंड अळीचे संकट लक्षात घेऊन दयानंद यांनी कापूस पीक काढून उरलेल्या पऱ्हाटी जाळल्या आहेत. रिकाम्या झालेल्या क्षेत्रात हरभरा, गव्हाची पेरणी केली आहे. रब्बी पिकानंतर फेब्रुवारी, मार्चमध्ये केळीची लागवड केली जाते. शेती आणि पशुपालन व्यवसायात देवानंद यांना पत्नी सौ. सोनाली यांची चांगली साथ मिळाली आहे.

दुधाळ म्हशींचे संगोपन
तीन वर्षांपासून वीस जाफराबादी आणि वीस मुऱ्हा म्हशींचे संगोपन. म्हशींची प्रति दिन १५ लिटर दूधउत्पादनाची क्षमता.
शेतात ३२ फूट बाय १०० फुटांचा गोठा. चारा साठवणुकीसाठी गोदाम.
म्हशींची वेळेवर आरोग्य तपासणी, तसेच योग्य लसीकरणावर भर.
दुधात सातत्य राहण्यासाठी योग्य गुणवत्तेचा चारा, खनिज मिश्रणाचा पुरवठा.
सध्या २६ म्हशी दुधात आहेत. सरासरी दररोज २५० लिटर दुधाचे संकलन. 
गोठा व्यवस्थापन, म्हशींचे दूध काढणे, चारा, पशुखाद्य देण्यासाठी दोन कायमस्वरूपी मजूर. त्यांना प्रत्येकी दरमहा दहा हजार रुपये वेतन व रोज दोन लिटर दूध दिले जाते. त्यांच्या निवासाची गोठ्यानजीक व्यवस्था.
कूपनलिकेच्या माध्यमातून गोठ्यामध्ये पुरेसा पाणीपुरवठा. गोठा आणि म्हशींच्या स्वच्छेतवर भर.
पावसाळ्यात भारनियमनाची समस्या, यामुळे जनित्राची सोय.
चार एकरांवर विविध चारा पिकांची लागवड. याचबरोबरीने ज्वारी, मका कडबा, सोयाबीन, हरभऱ्याचे कुटार आदी चाऱ्याची ठोक खरेदी.   
हिरवा चारा, कडबा कुट्टी सोयाबीन, हरभऱ्याच्या कुटारमध्ये मिसळून म्हशींना दिली जाते.

दर आठवड्याला पशुवैद्यकांची भेट. उपचारांसाठी महिन्याला तीन हजारांचा खर्च. जातिवंत दुधाळ म्हशी गोठ्यामध्येच तयार करण्यावर भर.

म्हशींचे व्यवस्थापन, चारा, पशू आहार, आरोग्य व्यवस्थापन, मजुरी खर्च वजा जाता दरमहा सरासरी ८ ते १० हजारांचा नफा. बाजारपेठेनुसार नफ्यात चढ-उतार.

थेट ग्राहकांना दुधाची विक्री 
गाव परिसरात म्हशींचा अद्ययावत गोठा नाही. त्यामुळे परिसरातील ग्राहकांच्याकडून म्हशीच्या दुधाला चांगली मागणी असते. ग्राहकांना दुधाची जागेवरच विक्री केली जाते. याचबरोबरीने विदगाव, कोळन्हावी, पुनगाव, डांभुर्णी येथील चहा व्यावसायिक, घरगुती वापरासाठी ग्राहक गोठ्यावर येऊन दूध खरेदी करतात. ग्राहकांना ६० रुपये प्रति लिटर या दराने २०० लिटर दुधाची विक्री होते. दुधाचा दर्जा चांगला असल्याने ग्राहकांची संख्या वाढत आहे. यामुळे घरोघरी जावून किंवा पूर्ण दूध डेअरीत विक्री करण्याची गरज नाही. ग्राहकांना देऊन उरलेले ५० लिटर दूध धानोरा (ता.चोपडा) येथील डेअरीला दिले जाते. सध्या देवानंद यांच्याकडे मावा, पेढा तयार करण्याची यंत्रणा आहे. पुढे आवश्यक आधुनिक यंत्रणा घेऊन डेअरीत उपपदार्थांच्या विक्रीचे नियोजन त्यांनी केले आहे.

 देवानंद सोळंके, ७७७३९०८९९९

(Edited By- Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com