अंबरनाथच्या भावा-बहिणीने साकारला अनोखा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

चिखलोली भोईर बहीण-भावांनी साकारला गरिबांना परवडणारा कूलर, इकोफ्रेंडली सायकल...

अंबरनाथ - वातावरणातील बदलामुळे दिवसागणिक वाढत जाणारा कमालीचा उकाडा; तर दुसरीकडे वातानुकूलन यंत्राच्या किमती वाढल्यामुळे त्या सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहेत. अशा वेळी गरिबांना या वस्तू वापरणे केवळ अशक्‍यच. मात्र, अंबरनाथ तालुक्‍यातील चिखलोली येथील चैताली दत्तात्रय भोईर हिने अनोखा व मुख्य म्हणजे स्वस्तामधील कूलर तयार केला आहे. या कूलरमुळे गरिबांसाठीही यंदाचा उन्हाळा नक्कीच सुसह्य होऊ शकेल. विशेष म्हणजे चैतालीबरोबरच तिचा लहान भाऊ सुबोध यानेही बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे. या दोन्ही भावंडांच्या या प्रयोगांबद्दल परिसरात विशेष कौतुक होत आहे.  

उल्हासनगर येथील चांदीबाई महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात चैताली शिकत आहे. महाविद्यालयात झालेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी चैतालीला सगळ्यांपेक्षा वेगळा असा प्रयोग सादर करायचा होता. काय करता येईल, असा विचार करत असताना तिला या कूलरची कल्पना सुचली. तिने हा कूलर तयार करून महाविद्यालयातील विज्ञान प्रदर्शनात मांडला. तेव्हा सर्वांनीच तिच्या या प्रकल्पाचे कौतुक केले. इतकेच नव्हे, तर या प्रकल्पासाठी तिला प्रथम क्रमांकही मिळाला. तिच्या या अनोख्या प्रयोगामुळे यंदाचा उन्हाळा गरिबांसाठी थंडा थंडा कुल-कुल ठरणार आहे. चैतालीच्या यशाबद्दल  भाजपच्या प्रभारी पूर्णिमा कबरे यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे. भविष्यात सौरऊर्जेवरील प्रयोग करण्याचा तिचा मानस आहे. बदलापूरच्या पोद्दार शाळेत आठवीत शिकणाऱ्या सुबोधनेही ताईच्या पावलावर पाऊल टाकत प्रयोग साकारला आहे. त्याने बॅटरीचा उपयोग करून पॅण्डल न मारता पळू शकणारी सायकल तयार केली आहे.

असा आहे कूलर
चैतालीने या कूलरसाठी घरातील एक प्लास्टिकची जुनी बादली घेतली. त्यावर तिने एक छोटासा एक्‍झॉस्ट पंखा बसवला. बादलीत हवा मोकळी राहील याची खबरदारी घेऊन तिने बादलीत बर्फाचे खडे टाकले आणि बर्फ वितळू नये म्हणून थर्माकोल किंवा जाड पुठ्ठे त्यावर बसवले. त्यामुळे बादलीमध्ये थंड हवा तयार झाली की ती बादलीच्या बाहेरच्या बाजूला तयार केलेल्या मोठ्या तीन छिद्रांतून बाहेर पडते. या बादलीसमोर बसलेल्यांना ही थंडगार हवा जाणवते. चैतालीने तयार केलेल्या या कूलरला साधारण एक हजार रुपये इतका खर्च आला आहे. बादलीऐवजी ड्रम वापरला, तर आणखी जास्त जणांना थंडगार हवा मिळू शकेल, असा चैतालीचा दावा आहे.

बॅटरीवर चालणारी सायकल!
उंची लहान असल्याने सुबोध याला दुचाकी चालवण्यास घरच्यांनी अटकाव केला. नेमकी हीच संधी साधून सुबोधने त्याच्या सायकलीला चार्ज होणाऱ्या बॅटऱ्या लावल्या. त्यानंतर स्कूटरप्रमाणे वेग वाढवता येईल अशी यंत्रणा त्याने निर्माण केली आहे. बॅटरी चार्ज झाली की साधारण तीन किलोमीटरपर्यंत सायकल धावू शकते. त्यामुळे इंधनाचा खर्च आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषण टाळता येते. सायकली चालवताना टेपरेकॉर्डरवरून गाणीही ऐकता येऊ शकतील, अशी शक्कल त्याने लढवली आहे. सायकलीला सुबोधने स्वतः रंगरंगोटी केली आहे; शिवाय रंगीत विद्युतदिव्यांची माळ लावली आहे. त्यामुळे ही सायकल रात्रीच्या काळोखात उठून दिसते.

Web Title: Ambernath brother-sister played a unique experiment