एकलहऱ्यात अंगणवाडी परसबाग प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

मंचर - एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एक ते सहा वयोगटातील मुलांना सेंद्रिय शेतीद्वारे स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळावा म्हणून नऊ शेतकऱ्यांनी लोकसहभागातून अंगणवाडी परसबाग प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यामध्ये शेवगा, पालक, आळू, फ्लावर, कोबी,  वांगी, कढीपत्ता, राजमा, भोपळा, तूर, मेथी ,कोथिंबीर आदी पिके घेतली आहे. पिकांची जोमदार वाढ होत आहे. 

एकलहरे येथे कळंब बीटातील लोंढे मळा येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे अंगणवाडी परसबाग प्रकल्प राबविला आहे. अमोल डोके, सचिन लोंढे, योगेश लोंढे ,बाळू लोंढे, गणेश लोंढे, संजीवनी पोखरकर, अनुसया बाणखेले, पुष्पा उपाध्ये आदी शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर, सुपीक माती, अवजारे आदींच्या साह्याने परसबाग तयार केली. 

उत्पादित भाजीपाला व तरकारीचा पोषण आहारासाठी वापर सुरू झाला आहे. अंगणवाडी परसबाग प्रकल्प उद्‌घाटनानिमित्त अंगणवाडीतील बाळगोपाळांनी भाजी रोपाची वृक्षदिंडी काढण्यात आली होती. अंगणवाडी सेविका मनीषा संदीप बाणखेले व मदतनीस मनीषा संजय घारे यांनी वृक्षदिंडीची व्यवस्था पाहिली. 

अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका अर्चना बोराडे यांच्या हस्ते अंगणवाडी परसबाग प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांच्या हातात जनतेचे आरोग्य आहे. त्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर वाढवून निकोप आरोग्याची जोपासना करावी.’’ पांडुरंग सोमवंशी, रमेश सोमवंशी, सचिन सोमवंशी यांनी सुशोभीकरणासाठी विटा पुरविल्या. परसबागेसाठी योगदान दिल्याबद्दल नवनाथ डोके ,अनिता लोंढे, संजना लिगाडे, विठ्ठल डोके, गणेश लाडके, ज्ञानेश्वर उपाध्ये यांचा बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मनीषा घारे यांनी केले.

Web Title: Anganwadi Parsabaag Project