आर्किटेक्‍टनी बदलवलं गावाच रूप 

अरुण सुर्वे
Monday, 24 February 2020

सामाजिक बांधिलकीची आस अन विकासाची धमक असेल तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नसते, याचाच प्रत्यय आर्किटेक्‍टनी एकत्र येत स्थापन केलेल्या ई-सीड ट्रस्टच्या सभासदांनी आपल्या कामातून दिला आहे.

पुणे - सामाजिक बांधिलकीची आस अन विकासाची धमक असेल तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नसते, याचाच प्रत्यय आर्किटेक्‍टनी एकत्र येत स्थापन केलेल्या ई-सीड ट्रस्टच्या सभासदांनी आपल्या कामातून दिला आहे. पुण्यातून स्वखर्चाने कोल्हापूरला आठवड्यातील दोन दिवस जाऊन त्यांनी राघूचा धनगरवाडा या गावाचा कायापालट केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानंतर तिथल्या अनेक गावांमधील जनजीवन विस्कळित झाले. हजारो नागरिकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी पुढाकार घेत ठिकठिकाणी मदतकार्य सुरू केले. अशाच पद्धतीने कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्‍टच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्थापन केलेल्या "ई-सीड' ट्रस्टचे देशभरात सभासद असून, आता ते विदेशातही कार्यरत आहेत. यातील पुणे विभागातील सभासदांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्‍यातील शित्तूर वारूण येथील 400 लोकसंख्या असलेल्या राघूचा धनगरवाड्याची विकासकामांसाठी निवड केली. 

या गावामधील रहिवाशांचा शेती हाच उदरनिर्वाहाचा व्यवसाय. गावात कोणीही मद्यपान करत नाही. गावाच्या कडेला डोंगरदऱ्या आहेत; पण, पाणी नाही. त्यामुळे आर्किटेक्‍ट तरुणांनी डोंगराच्या कडेला चर खोदून पाणी अडविण्यास सुरुवात केली. एका ठिकाणी बारमाही विहीर सापडली. वन विभागाच्या सहकार्याने तेथील पाणी गावात आणले जाणार आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन तेथे बांबूची लागवड केली जाणार आहे. त्याचप्रमाणे महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रशिक्षणही देणार आहे. गावाचा कायापालट करण्यासाठी अंगणवाडी व प्राथमिक शाळेचे शिक्षक तसेच परिसरातील डॉक्‍टरांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याचे पुष्कराज बंकापुरे यांनी सांगितले. 

राघूचा धनगरवाड्यामध्ये ट्रस्टमधील सभासद स्वखर्चाने शनिवार-रविवारी काम करतात. त्यातून त्यांना समाधानही मिळते. त्यातून गावाचे रूप बदलत आहे. 
- पुष्कराज बंकापुरे, सभासद, ई-सीड ट्रस्ट 

आम्ही आर्किटेक्‍टचे शिक्षण घेतले असले तरी त्याचा सामाजिक उपयोग झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही या गावात लोकसहभागातून काम करत आहोत. आतापर्यंत त्यासाठी सुमारे 12 लाख रुपये खर्च केले आहेत. 
- अंजली अग्रवाल, अध्यक्ष, ई-सीड ट्रस्ट 

काय केल्या उपाययोजना... 
- गावाच्या कडेला डोंगर आहेत. त्यामुळे कडेला चर खोदून "पाणी आडवा, पाणी जिरवा' मोहीम राबविली. 
- एक बारामाही विहीर सापडली आहे. वनविभागाच्या सहकार्याने त्यातील पाणी गावामध्ये आणणार आहे. 
- ठिकठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून हातपंप बसविणार आहेत. 
- सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था केली. 
- बांबूची लागवड करून महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणार आहे. 
- गावातील घरे, अंगणवाडी व शाळेला रंगरंगोटी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Architecture has changed village appearance

Tags
टॉपिकस
Topic Tags: