esakal | समाजकार्याची सशक्त ‘डोर’ 
sakal

बोलून बातमी शोधा

gul-panag

गुल पनागनं आम आदमी पक्षातर्फे लोकसभेची निवडणूकसुद्धा लढवली. त्यात तिला यश मिळालं नसलं, तरी त्या निमित्तानं सामाजिक कामासाठीची तिची पॅशन जगापुढं आली.

समाजकार्याची सशक्त ‘डोर’ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुल पनाग ही अभिनेत्री एकीकडे ग्लॅमरच्या जगात काम करतानाही स्वतःची वेगळी ओळख तयार करते आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसाठी काम करणाऱ्या गुलनं स्वतःही कर्नल समशेरसिंग फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली आहे. पर्यावरणजागृतीपासून स्वमग्न मुलांसाठीच्या शाळेपर्यंत अनेक गोष्टी करणारी गुल तिच्या ‘डोर’ या चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसारखीच सशक्त आणि कणखर आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही वेळा भूमिका आणि प्रत्यक्षातली व्यक्तिरेखा यांच्यात किती साम्य असतं! ‘डोर’ या चित्रपटात अतिशय सशक्त व्यक्तिरेखा साकारणारी गुल पनाग हे त्याचं आदर्श उदाहरण. गुल पनाग प्रत्यक्षातही त्या व्यक्तिरेखेसारखीच सकारात्मक आणि संघर्षशाली आहे. एकाच वेळी स्वमग्न मुलांसाठी शाळा चालवणारी गुल पनाग ‘एमफिटनेस’ नावाच्या स्टार्टअपची स्थापना करते आणि त्याच वेळी जवानांच्या प्रेरणादायी कहाण्या सांगणारा ऑडिओ पॉडकास्टही सादर करते. एकीकडे ग्लॅमरनं न्हाऊन निघालेली गुल सोशल नेटवर्किंग साइट्सवरून विविध मुद्द्यांवर आवाज उठवते, मतं मांडते आणि त्याच वेळी समाजकार्यामध्येही झोकून देते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुल पनागचं सध्याचं मोठं काम म्हणजे तिनं कर्नल समशेरसिंग फाऊंडेशन नावाची एक संस्था स्थापन केली आहे. लिंगभावनिरपेक्ष समाज निर्माण करणं; कचरामुक्ती, मलनिस्सारण, शिक्षण असे वेगवेगळे उद्देश घेऊन ती या संस्थेद्वारे काम करते. या फाऊंडेशनला तिनं तिच्या आजोबांचं नाव दिलं आहे. त्यांनी समाजकार्याची ज्योत लावली, तिच्या वडिलांनी ती पुढं नेली आणि त्यामुळं ती ज्योत गुल पनागनंही पुढं नेण्याचा संकल्प सोडला आहे. केवळ स्वतःच्या नावाचा ती ब्रँड म्हणून वापर करत नाही, तर स्वतः संस्थेच्या कामात सक्रिय सहभाग घेते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘श्रद्धा’ नावाची संस्था स्वमग्न मुलांसाठी एक शाळा चालवते. त्याच्यासाठी निधी उभारणं, त्या शाळेच्या समस्या सोडवणं यासाठीही गुल पनागनं काम केलं आहे. कापूस शेतकऱ्यांसाठी काम करणारी ‘शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड’; पर्यावरणासाठी काम करणारी ‘ग्रीन कमांडोज’; सार्वजनिक स्वच्छतागृहांचं जाळे उभारणारी ‘सुलभ इंटरनॅशनल’ अशा अनेक संस्थांनाही गुलनं बळ दिलं आहे. महिलांची मॅरेथॉन असलेल्या ‘पिकॅथॉन’मध्येही गुल पनाग सक्रिय सहभाग घेते. वापरलेले कंप्युटर्स एकत्र करून ते ग्रामीण भागांत मुलांना उपलब्ध करून देण्याची मोहीमही तिनं चालवली. पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवर सजग असणारी गुल सौरऊर्जेबाबत आणि जलसंचय यंत्रणांबाबत आग्रही मत मांडते आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सचा उपयोग करून त्याचा प्रसारही करते. गुल पनागनं आम आदमी पक्षातर्फे लोकसभेची निवडणूकसुद्धा लढवली. त्यात तिला यश मिळालं नसलं, तरी त्या निमित्तानं सामाजिक कामासाठीची तिची पॅशन जगापुढं आली. ‘समाजकार्य हे केवळ फॅशन म्हणून करण्याचं काम नव्हे, तर पॅशननं करण्याचं काम आहे,’ असं मानणारी गुल पनाग आज स्वतःच्या या वेगळ्या प्रतिमेमुळं ग्लॅमरच्या गर्दीत आणखी उजळून दिसते आहे. 

माझं वैयक्तिक उद्दिष्ट म्हणजे शक्य तितक्या महिलांचं शक्य तितकं सबलीकरण करणं. सबलीकरण म्हणजे झाडावर फळ उगवेल आणि कुणी तरी ते काढून देईल, असं नसतं. सबलीकरण म्हणजे तुम्ही समान आहात यावर तुमचाच असलेला विश्वास. तुम्हाला स्वतःला जेव्हा त्यावर विश्वास बसेल, तेव्हा तुमचं सबलीकरण झालेलं असेल. 
- गुल पनाग, अभिनेत्री