esakal | उद्यमशीलतेला ‘चंदेरी’ झळाळी 
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka-chopra

एकीकडे महिला उद्योजकांची संख्या वाढत असताना ग्लॅमरच्या क्षेत्रातले कलाकारही त्यांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहनाचे बळ देत आहेत. त्यात ताजं नाव आहे प्रियांका चोप्राचं.

उद्यमशीलतेला ‘चंदेरी’ झळाळी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ग्लॅमरच्या क्षेत्रातले कलाकारही उद्यमशीलतेला प्रोत्साहनाचे बळ देत आहेत. त्यात ताजं नाव आहे प्रियांका चोप्रा. इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करून उद्योजकतेला कसं पाठबळ देता येऊ शकतं आणि विशेषतः महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअप्सचा प्रचार आणि प्रसार कसा करता येऊ शकतो,याची चुणूक प्रियांकानं दाखवून दिली आहे.

एकीकडे महिला उद्योजकांची संख्या वाढत असताना ग्लॅमरच्या क्षेत्रातले कलाकारही त्यांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहनाचे बळ देत आहेत. त्यात ताजं नाव आहे प्रियांका चोप्राचं. इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करून उद्योजकतेला कसं पाठबळ देता येऊ शकतं आणि विशेषतः महिलांनी सुरू केलेल्या छोट्या उद्योगांबाबत कसा प्रचार आणि प्रसार करता येऊ शकतो, याची चुणूक प्रियांकानं दाखवून दिली आहे. तिनं केलेल्या आवाहनामुळे महिलांच्या अनेक छोट्या स्टार्टअप्सना फायदा होतो आहे. विशेषतः कोरोनामुळे फटका बसलेला असताना या उद्योगांना डोकं वर काढण्यासाठी उपयोग होतो आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात तेव्हा त्या कुटुंबं, समाज आणि देशालाही बदलू शकतात,’ असं प्रियांकानं भारताच्या स्वातंत्र्यदिनी लिहून आर्थिक स्वातंत्र्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मात्र, प्रियांका केवळ हे विचार व्यक्त करून थांबली नाही, तर तिनं छान पाऊल उचलून प्रेरणेची एक छोटी पणती लावली आहे. ‘‘प्रेरणादायी महिलांनी सुरू केलेल्या काही उद्योगांना पाठबळ देण्याची छोटी सुरुवात मी केली आहे. महासाथीमुळे फटका बसलेल्या या उद्योगांना आपण मदत करून त्यांच्या व्यवसायांना आधार देऊ शकतो,’’ असं प्रियांकानं म्हटलं आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

#SupportSmallBiz हा हॅशटॅग वापरून प्रियांकानं व्हिडिओ पोस्ट केले असून, तिच्या फॉलोअर्सना ती उत्पादनं घेण्याचं आवाहन केलं आहे. प्रियांकानं कोणत्या स्टार्टअप्सना पाठबळ देण्याची भूमिका घेतली आहे, तेही महत्त्वाचं आहे. 

प्रियांकाचं पाठबळ मिळालेली स्टार्टअप 
राजस्थानातल्या महिला शिवणकाम कारागिरांना काम देणारी ‘स्वरा-व्हॉइस ऑफ वुमेन’
 ग्रामीण भागात छोट्या वस्तूंचं उत्पादन करणारी ‘आय एम रुरल’
 क्रोशाच्या वस्तू तयार करणारी ‘हॅप्पीथ्रेड्स बायसुपर मॉम्स’
 आदिवासी कलाकारांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या ‘ओखाई’ आणि‘सुरा कनावू’
वरील स्टार्टअप्सनी तयार केलेल्या वस्तू विकत घेण्याचं आवाहन प्रियांकानं केलं आहे. प्रियांकानं ‘पद्मश्री’ सन्मान प्रदान समारंभात नेसलेली जामदनी साडी ज्या ब्रँडची होती, तो ‘माधुर्य’ ब्रँड, हाताने विणलेले ‘एका’ ड्रेसेस, ‘का-शाज’चे हाताने तयार केलेले एन्सेंबल्स अशा लेबल्सचा प्रसार प्रियांकानं यापूर्वीही केला आहे. मात्र, या वेळी तिनं कोणत्या गोष्टींचा प्रसार करायचा याचीही स्वतःसाठीच एक चौकट आखून ठेवली आहे. प्रियांका या वेगळ्या इनिशिएटिव्हमध्ये एकटी नाही. रिया कपूरनंही #TheGoodInfluencer नावाचा हॅशटॅग वापरून अशाच प्रकारे स्थानिक ब्रँड्सचा प्रसार करायला सुरुवात केली आहे. प्रभावशाली व्यक्तींनी त्या प्रभावाचा वापर योग्यपणे केला, तर त्याचा उद्योजकतेला किती फायदा मिळू शकतो, याचं हे उदाहरण. प्रेरणेची पणती लावणं महत्त्वाचं... शेवटी अंधार तर तीच दूर करते ना!