भरारी अमर्याद स्वप्नांसाठीची... 

usha-jadhav
usha-jadhav

उषा जाधव ही मराठी, हिंदीसह जगभरातील विविध भाषांत अभिनय करणारी अभिनेत्री. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका छोट्या गावातून तिचा प्रवास सुरू झाला. तिला २०१२मध्ये ‘धग’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तरी ‘माई घाट’ या चित्रपटासाठी मागील वर्षी भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील २०० चित्रपटांतून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सौंदर्याचे पारंपरिक निकष मोडून काढत आपल्या पंखांच्या जोरावर अमर्याद स्वप्नं पाहणाऱ्या उषाविषयी... 

उषा जाधव एका सर्वसामान्य कुटुंबातून चित्रपटसृष्टीमध्ये आलेली मुलगी. वडील सैन्यदलात; तर आई गृहिणी. तिनं सातव्या इयत्तेत असताना शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये नाट्यस्पर्धेत भाग घेतला व प्रथम पुरस्कार मिळाला. या घटनेनं तिच्या मनात प्रथमच अभिनयाचं बीज पेरलं गेलं. तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण कोल्हापुरात झालं व नंतर ती पुण्यामध्ये नोकरी करण्यासाठी आली. तिनं एका टुरिस्ट कंपनीमध्ये तीन वर्षं कामही केलं. मात्र, अभिनयाचं वेड तिला शांत बसू देत नव्हतं. त्यामुळं तिनं मुंबईमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एकटी मुलगी मुंबईसारख्या अनोळखी शहरात जाणार असल्यानं आई-वडिलांनी मोठा विरोध केला; मात्र उषानं मुंबईत जाऊन स्ट्रगल करण्याचा निर्णय पक्का केला होता. मुंबईत छोटी-मोठी कामं मिळू लागली. त्यात मधुर भांडारकरांच्या ‘ट्रॅफिक सिग्नल’सारख्या चित्रपटाचा समावेश होता. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तिनं काही जाहिरातींमध्ये अभिनय केला व त्यामुळं तिची इंडस्ट्रीमध्ये ओळख वाढली. जाहिरातींचे क्रिएटिव्ह हेड नितेश तिवारी यांच्यामुळं अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तिचा जम बसू लागला. त्यानंतर रामगोपाल वर्मा यांनी ‘वीरप्पन’मध्ये तिला महत्त्वाची भूमिका दिली. उषानं मधल्या काळात अरुणा राजे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फायरब्रॅंड’ या मराठी चित्रपटातही काम केलं. राजेंबरोबर काम करण्याचा अनुभव तिला बरेच काही शिकवून गेला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनंत महादेवन यांनी उषाला या वर्षी ‘माई घाट’ या चित्रपटाची ऑफर दिली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावातील ही सत्यकथा. माई आपल्या दोन मुलांसह राहत असते. तिचा मोठा मुलगा हाताशी आलेला असतो, केवळ खुन्नस म्हणून पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू होतो. मुलाला न्याय मिळवून देण्याचा माईचा संघर्ष तब्बल १३ वर्षे सुरू राहतो. शेवटी तिला न्याय मिळतो आणि माईचं नाव पंचक्रोशीत आदरानं घेतलं जाऊ लागतं. ‘माई घाट’साठी या उषाला ७६ भाषांतील २०० चित्रपटांतून सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. याच महिन्यात ‘माई घाट’मधील भूमिकेसाठीच तिला इंडो-जर्मन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा आणखी एक पुरस्कार मिळाला आहे. तिनं ब्रिटन आणि स्पेनमधील अनेक चित्रपटांत भूमिका केल्या असून, त्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळवले आहेत. छोट्या गावातून चित्रपसृष्टीच्या मायाजालात प्रवेश करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांत ठसा मिळविणाऱ्या या मराठमोळ्या रंग'शारदे’स सलाम! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com