कमकुवत हातांना शिक्षणाच्या ओढीने बळ

श्रीकिशन काळे
सोमवार, 2 जानेवारी 2017

पुणे - तिचे करिअर सुरू होण्यापूर्वीच संपविण्याचा जणू बेतच खुद्द तिच्याच हाताने केला होता. कारण ऐन बारावीत तिच्या हाताला ‘रायटिंग क्रॅम्प’ आला होता. त्यामुळे डॉक्‍टरांनी ती कधीच हातात पेन घेऊ शकणार नाही, असे सांगितले होते; परंतु तिच्या मनात शिक्षण घेण्याची प्रचंड ओढ होती. म्हणूनच तिने कमकुवत हातांमध्ये बळ निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळेच ती सीए बनली आणि आता नुकतीच पीएचडी मिळवली. तिचे नाव असिमा डाके-कुलकर्णी.

सागरी तुफान यावं आणि त्यानं सर्व काही होत्याचं नव्हतं करावं, असंच काहीसं असिमा बारावीला असताना झालं होतं. ‘तू आता कधीच लिहू शकणार नाहीस’ या डॉक्‍टरांच्या वाक्‍यानं असिमा मनातून कोलमडली. ‘रायटिंग क्रॅम्प’मुळे तिच्या हातातील शक्ती गेली असली, तरी तिच्या मनातील शिकण्याचं बळ अजून तसंच होतं.  तिला शिकून आपलं एक वेगळं विश्‍व निर्माण करायचं होतं. हे निर्मितीचं बीज तिच्या रक्तातच होतं ! कारण तिचे वडील विश्‍वास डाके डॉक्‍टर आहेत. तिच्या या काळात तिला आई-वडिलांनी खूप आधार दिला. चांगल्या डॉक्‍टरांकडे दाखवलं; पण उपयोग झाला नाही. मग तिच्या बाबांचे मित्र डॉ. दीपक रोकडे आणि डॉ. माधुरी रोकडे यांनी तिला ॲक्‍युपंक्‍चरच्या उपचारांबाबत सांगितले. ॲक्‍युपंक्‍चरच्या डॉक्‍टरांनीही असिमाला सांगितले, की या उपचाराने तुझे हात शंभर टक्के बरे होतीलच, याची खात्री नाही. तरीदेखील असिमाने उपचार घेतले. हातात असंख्य सुया टोचल्या जाऊ लागल्या. सात-आठ दिवसांनी तिला पेन धरता येऊ लागले. 

त्यामुळे तिचा आत्मविश्‍वास वाढला. बारावी सायन्सची परीक्षा दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली होती. परीक्षेसाठी तिला रायटर मिळत होता; परंतु तिने घेतला नाही. खूप वेदना होत असतानाही तिने परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाली. पुढचं शिक्षण घेणं तिच्यासाठी आव्हान होतं. तिनं पुढे काय करावं, याचा विचार करण्यात एक वर्ष घालवलं. दरम्यान, उपचारही सुरू होतेच. तेव्हा असिमाचा मोठा भाऊ घोषाल हा सीएचा अभ्यास करत होता. त्याचा अभ्यास आणि पुस्तकं पाहून असिमानेही सीए होण्याचा निर्णय घेतला. बारावीनंतर वाणिज्य शाखा निवडली. 

सीएची पहिली परीक्षा दिली. परीक्षेला जाण्यापूर्वी ती दररोज सकाळी पाऊणतास हातात सुया टोचून घ्यायची. त्यानंतर ती दुपारी परीक्षा द्यायची. तिच्या शिकण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे ती सीएच्या पहिल्या परीक्षेत पुण्यात पहिली आणि देशात चौदावी आली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. हातात बळ जरी कमी असलं, तरी तिचं मन मात्र खंबीर होतं. त्यात तिला आई-वडील, भाऊ, डॉक्‍टर आणि पती कॅप्टन प्रशांत कुलकर्णी यांनी खूप आधार दिला. त्यांच्यामुळेच तिने एक-एक आव्हान पादाक्रांत केले.

Web Title: asima dake-kulkarni