
मंदिराचं बांधकाम संसद भवनाच्या बांधकामात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केलं जात आहे.
रामायण मंदिरासाठी मुस्लिम व्यक्तीनं 2.5 कोटींची जमीन केली 'दान'
बिहारमधील (Bihar) पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवलिया इथं जगातील सर्वात उंच (270 फूट) रामायण मंदिराचं (Ramayana Temple) बांधकाम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. याकरता एका मुस्लिम व्यक्तीनं (Muslim Person) मंदिर उभारणीसाठी सुमारे अडीच कोटी रुपयांची जमीन देऊन जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न केलाय. मंदिराच्या उभारणीसाठी 125 एकर जागेची आवश्यकता असून, त्यापैकी आतापर्यंत 100 एकर जागा मंदिराला मिळालीय.
आज (बुधवार) कैथवलियाचे जमीनदार इश्तियाक मोहम्मद खान (Ishtiaq Mohammad Khan) यांनी मंदिराच्या बांधकामासाठी 23 एकर (71 दशांश) भूखंड दान केलाय. त्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. याआधीही मंदिरासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून सहकार्य करण्यात आलंय. मंदिरासाठी मोफत जमीन देणारा इश्तयाक म्हणतो, हिंदू-मुस्लिम ऐक्य सगळ्यांनी जपलं पाहिजे. एकमेकांविरुध्द संघर्ष न करता चांगलं राहिलं पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं. पाटणा महावीर मंदिराचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितलं की, 'इश्तियाकच्या कुटुंबीयानं जमीन दिली नसती, तर आम्ही मंदिर बांधू शकलो नसतो.'
या प्रस्तावित जागेवर मंदिराचं बांधकाम संसद भवनाच्या बांधकामात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केलं जाईल. मंदिराच्या बांधकामाचा आराखडा तयार करण्यासाठी अहमदाबादस्थित वास्तुविशारद पियुष सोमपुरा आणि इंटिरियर डिझायनर नवरत्न रघुवंशी यांची मदत घेण्यात आलीय. हे मंदिर 2027 पर्यंत बांधण्याचं नियोजन आहे.
जगातील सर्वात उंच शिवलिंग रामायण मंदिरात बसवलं जाणार
महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव किशोर कुणाल यांनी सांगितलं की, 'जगातील सर्वात उंच शिवलिंग प्रथम विराट रामायण मंदिरात बसवलं जाणार आहे. हे शिवलिंग 33 फूट उंच आणि 33 फूट गोलाकार असेल. शिवलिंगाच्या बांधकामासाठी कन्याकुमारीजवळ 250 मेट्रिक टन ग्रॅनाइट दगड खरेदी करण्यात आलं आहे.'