दुःख सावरण्यासाठी लाखमोलाची मदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

कऱ्हाड येथील कार्वे नाक्‍यावरील एका गवंडी काम करणाऱ्या कुटुंबातील बाळाच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी काही तासांत पावणेतीन लाखांपैकी एक लाख ३० हजारांची मदत जमा झाली आहे. त्यामध्ये वसीम शेख, सागर बर्गे मित्र परिवाराचा पुढाकार होता. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कऱ्हाड - येथील कार्वे नाक्‍यावरील एका गवंडी काम करणाऱ्या कुटुंबातील बाळाच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी काही तासांत पावणेतीन लाखांपैकी एक लाख ३० हजारांची मदत जमा झाली आहे. त्यामध्ये वसीम शेख, सागर बर्गे मित्र परिवाराचा पुढाकार होता. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

येथील कार्वे नाक्‍यावरील इम्रान व परवीन मुजावर कुटुंबाचा रोजच कमवायचे आणि पोट भरायचे, असा त्यांचा चरितार्थ ठरलेलाच. इम्रान गवंडी काम तर परवीन घरकाम करतात. त्यांना अवघ्या एक वर्षाचं बाळ, त्याचं नाव खदीजा. कष्ट करून जगणाऱ्या कुटुंबाला जणू नजर लागल्यासारखी स्थिती झाली.

खदीजा बाळालाही हृदयाचा त्रास सुरू झाला. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी पावणेतीन लाखांचा खर्च होता. शस्त्रक्रियेचा खर्च मुजावर यांच्यासमोर आभाळाएवढा होता. मात्र, त्यांचा तो खर्च सावरण्यासाठी समजून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. पावणेतीन लाखांपैकी एक लाख ३३ हजारांची मदत उभी राहिली. डी टू डी डान्स ॲकॅडमीचे वासीम शेख, सागर बर्गे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आर्थिक मदत मिळावी, म्हणून प्रयत्न केले. त्यातून उभी राहिलेली मदत कुटुंबासाठी आधारवड ठरली आहे. अजूनही त्यात वाढ होतच आहे. 

खदीजाच्या मदतीसाठी जमा झालेली मदत हृदयस्पर्शी कार्यक्रमात इम्रान व परवीन मुजावर यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यावेळी तिच्या आई-वडिलांना आभाळही ठेंगणं झालं होते. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या हस्ते ती रक्कम सुपूर्द केली. हळव्या मनाचे पोलिस उपअधीक्षक श्री. ढवळे यांनी जमा झालेल्या मदतीत स्वतःचे दहा हजार रुपये जमा केले. त्यामुळे तेथे अत्यंत भावनिक कार्यक्रम पार पडला. यावेळी बर्गे, शेख, नगरसेवक सौरभ पाटील, स्वाती पिसाळ, विद्या मोरे, जावेद नायकवडी व डी टू डी ॲकॅडमीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Help for heart Surgery Motivation Initiative