निराधार महिलेला बांधून दिले स्वखर्चाने घर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

धामणीदेवीतील तरुणांचा उपक्रम - ग्रामस्थांनी केला सत्कार, ‘निराधार’चा लाभ नाही

चिपळूण - खेड तालुक्‍यातील धामणीदिवी येथील एका निराधार महिलेस गावातील काही तरुणांनी स्वखर्चाने नवीन घर बांधून दिले. तरुणांच्या मदतीमुळे निराधार महिलेस हक्काचा निवारा मिळण्यास मदत झाली आहे.

धामणीदेवी येथील सईदा हसन खिसे यांना दोन विवाहित मुली आहेत. खिसे यांचे घर मोडकळीस आले असून त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

राज्य सरकारच्या घरकुल योजनेतून हक्काचा निवारा मिळेल अशी त्यांना आशा होती, मात्र अद्याप त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या निराधार महिलेस घराची आवश्‍यकता ओळखून तरुणांनी मदत करण्याचा निर्धार केला. सामाजिक कार्यकर्ते तसलीम फिरफिरे, ग्रामपंचायत सदस्य अजिम फिरफिरे यांच्यासह गावातील समाजातील सर्व लोकांनी सहकार्य करायचे ठरवले. घरकुलासाठी आर्थिक तरतूद नसल्याने प्रथम संजय नरळकर यांनी घर बांधून दिले. दरम्यान घराच्या बांधकामास सुरवात होताच गावातील अनेकांनी व धामणीदेवी मुस्लिम वेलफेअर सोसायटीने आर्थिक मदतीसाठी हातभार लावला. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण राऊत, श्री. फिरफिरे, ग्रामदेवता समितीचे उपाध्यक्ष संदीप गोवळकर आदींनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेत मदतीचे आवाहन केले. त्यानुसार आमदार जाधव यांनीही मदत दिली. सर्वांच्या योगदानातून अखेर श्रीमती खिसे यांना निवारा मिळाला. धामणदेवी एकता विकास मंच आयोजित एका कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामसेवकांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत दिलेल्यांची घोषणा केली. सहकार्य करणाऱ्या सर्व तरुणांचा विविध मान्यवरांच्या हस्ते खिसे यांच्या घरासमोरच सत्कार करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सदस्या सौ. संजीवनी नरळकर, सरपंच सुहास बहुतुले, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी हेमराज सोनकुसरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष काझी, मुख्याध्यापिका सौरवी जाधव आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chiplun konkan news Homeless house built by an unfaithful woman