गडचिरोलीतील सहाशे आदिवासींना कपड्यांचे वाटप 

कमलापूर (जि. गडचिरोली) - कॉम्पिटिटिव्ह फाउंडेशनच्या वतीने आदिवासी मुलांना कपडेवाटप करताना आयआरबीचे व्यवस्थापक रवींद्र वायाळ.
कमलापूर (जि. गडचिरोली) - कॉम्पिटिटिव्ह फाउंडेशनच्या वतीने आदिवासी मुलांना कपडेवाटप करताना आयआरबीचे व्यवस्थापक रवींद्र वायाळ.

राजगुरुनगर - सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मित्रांनी कॉम्पिटिटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून कमलापूर (जि. गडचिरोली) येथील सहाशे आदिवासींना दिवाळीनिमित्त कपड्यांचे वाटप केले; तसेच या भागातील युवकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा वाचनालयही सुरू करण्यात आले. 

फाउंडेशनचे खजिनदार व आयआरबी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक रवींद्र वायाळ यांनी पोलिस निरीक्षक आबा म्हसवडे, किरण सोनवणे, संजय जाधव यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. 

जिमलगत्ता विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे आदिवासी युवक नक्षलवादापासून दूर राहावेत व मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. त्यामध्ये वाचनालय चळवळीचा समावेश आहे. त्यासाठी फाउंडेशनच्या वतीने पुस्तके पुरवली जात आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅ. जयकर ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आणि आता प्रशासन, उद्योग, खासगी क्षेत्रांमध्ये उच्च पदावर कार्यरत असणारे सर्व मित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी एकत्र आले. त्यांनी व्हॉट्‌सऍपवर "जयकर फाउंडेशन' हा ग्रुप स्थापन केला. एकमेकांची सुखदुःखे शेअर करीत असतानाच सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील उपेक्षित घटकांसाठी काहीतरी केले पाहिजे, अशी सूचना वायाळ यांनी मांडली. त्यास सर्वांनीच पाठिंबा दिला. आनंदवन येथे डॉ. प्रकाश आमटे यांनी केलेले कार्य पाहून ग्रुपचे सदस्य प्रेरित झाले. गेल्या मे महिन्यामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते "कॉम्पिटिटिव्ह फाउंडेशन'चे उद्‌घाटन करण्यात आले. सन 1992 ते 2010 या काळात जयकर ग्रंथालयात अभ्यास करणारे व आता विविध पदांवर कार्यरत असणारे सुमारे 250 अधिकारी या फाउंडेशनचे सदस्य झाले आहेत. पोलिस आयुक्त महेश भागवत व आयएएस अधिकारी आनंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागामध्ये 100 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले; तर लौकी (ता. आंबेगाव) येथील वीस विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये युनिक ऍकॅडमीच्या सहकार्याने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. नानवीज येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या आवारात फाउंडेशनने पाच हजार झाडे लावली आहेत. 

यापुढेही गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींसाठी सुमारे दहा हजार कपडे व एक हजार पुस्तके पाठविणार असल्याचे ग्रुपचे अध्यक्ष व पुणे जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजयकुमार भोसले, उपाध्यक्ष ऍड. रवींद्र अडसुरे, संदीप भुजबळ, जयंत मंत्री यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com