रांगोळीच्या माध्यमातून भरतोय जीवनात रंग

- संजय बेंडे
रविवार, 29 जानेवारी 2017

भोसरी - हाडांच्या कॅन्सरमुळे आईचा डावा पाय कायमचा गेला, पुरात घर वाहून गेले, सहावीत असताना रक्ताच्या कॅन्सरचे निदान झाले, दोन वर्षे शाळा बुडाली, मधल्या काळात रांगोळीचा छंद लागला आणि जगण्याची नवी उमेद जागृत झाली...आज तो विविध समारंभांत रांगोळी काढून अनेकांच्या आनंदात रंग भरतो आहे. त्यातून मिळणाऱ्या मानधनातून घरखर्चाला त्याचा हातभार लागला आहे. नववीत शिकणाऱ्या भूषण खंदारे या विद्यार्थ्याच्या जिद्दीची ही कहाणी...

भोसरी - हाडांच्या कॅन्सरमुळे आईचा डावा पाय कायमचा गेला, पुरात घर वाहून गेले, सहावीत असताना रक्ताच्या कॅन्सरचे निदान झाले, दोन वर्षे शाळा बुडाली, मधल्या काळात रांगोळीचा छंद लागला आणि जगण्याची नवी उमेद जागृत झाली...आज तो विविध समारंभांत रांगोळी काढून अनेकांच्या आनंदात रंग भरतो आहे. त्यातून मिळणाऱ्या मानधनातून घरखर्चाला त्याचा हातभार लागला आहे. नववीत शिकणाऱ्या भूषण खंदारे या विद्यार्थ्याच्या जिद्दीची ही कहाणी...

भूषणचे कुटुंबीय मूळचे कोपर्डा (जि. अमरावती) गावचे. २००४ मध्ये त्याची आई सोनूबाई गिरिधारी खंदारे यांना हाडांचा कर्करोग झाला. डावा पाय मांडीपासून कापावा लागला. या आघातातून सावरत असतानाच २००५ मध्ये त्यांचे घर पुरात वाहून गेले. संसार उघड्यावर पडला. शेती नाही, कामधंदा नाही, अशा अवस्थेत खंदारे कुटुंब उदरनिर्वाहासाठी भोसरीत आले. दरम्यान, भूषणचे वडील गिरिधारी खंदारे यांना दारूचे व्यसन लागले. सोनूबाईंचा दवाखान्याचा खर्च आणि तीन मुलांसह कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा खर्च न झेपावल्याने गिरिधारी घर सोडून गावी निघून गेले. त्यामुळे मुलांसह घर खर्चाचा सर्व भार सोनुबाईंवर आला. एक पाय पूर्णपणे निकामी झाला असतानाही सोनुबाईंनी जिद्द सोडली नाही. त्यांनी भोसरीतील गंधर्वनगरीतील एका कारखान्यात कचरा वेगवेगळा करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर एका खाणावळीत स्वयंपाकाचे काम केले. २०१० मध्ये पांजरपोळ येथील फरांदे यांच्या कन्स्ट्रक्‍शन कार्यालयात सेविकेचे काम सुरू केले. आता संसाराचा गाडा पुढे काही प्रमाणात व्यवस्थित सुरू झाला. मात्र, २०११ मध्ये मुलगा भूषणला ताप आला. तपासण्या केल्या. त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. हे ऐकून सोनुबाईच्या पायाखालची जमीनच सरकली. चार ते पाच लाखांचा खर्च येणार असल्याचे पुण्यातील रुग्णालयाने सांगितले. मुलाच्या उपचारांसाठी सोनुबाईंनी सामाजिक संस्थांकडे धाव घेतली. त्यांना काही सामाजिक संस्थांकडून मदतही झाली.

मात्र, शस्त्रक्रियेसाठी सोनुबाईंना कर्जही काढावे लागले. भूषणचे सहावी आणि सातवीचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. दरम्यानच्या काळात भूषणला रांगोळी काढण्याचा छंद जडला. रांगोळीतील भूषणची कला पाहून संतोष अडागळे यांनी त्याला रांगोळीचे प्रशिक्षण दिले आणि बघता-बघता भूषण रांगोळी काढण्यात तरबेज झाला. आज भूषण पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील छत्रपती शिवाजी महाराज शाळेत नववीत शिकतो आहे. त्याच्या कर्करोगावर आजही उपचार सुरू आहेत. मात्र, अशा असाध्य आजाराचे दुःख उराशी न बाळगता रांगोळीच्या माध्यमातून लोकांना कलेचा आनंद देण्याचे काम तो करतो आहे. विविध कार्यक्रमासाठी त्याला रांगोळी काढण्यासाठी निमंत्रित केले जाते. रांगोळीचा खर्च वजा जाता एका रांगोळी मागे, ३००-३५० रुपये मिळत असल्याची माहिती भूषण देतो. भूषणमुळे खंदारे कुटुंबीयांना आर्थिक हातभारही लागत आहे. शिक्षण पूर्ण करून उंच भरारी घेण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे. 

माझा एक पाय निकामी झालेला असतानाही जिद्द सोडलेली नाही. मोठी मुलगी कॉलेजला आहे. मीही मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करीत आहे. सरकारी खात्यात नोकरीसाठी विविध परीक्षाही देत आहे. मला आशा आहे, की या परीक्षेत यशस्वी होऊन मला सरकारी नोकरी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: color of life through Rangoli