सतत नव्या अभ्यासाचा ध्यास

नीला शर्मा
सोमवार, 6 मार्च 2017

साने गुरुजींच्या विचारांनी प्रभावित झालेल्या माझ्या आई- वडिलांच्या संस्कारांत मीही विवेकवादी, विज्ञानवादी विचारांकडे झुकत गेले. लग्नानंतर नवऱ्यानेही माझ्या शोधक, प्रयोगशील स्वभावाला मोकळीक दिली. समानधर्मी माणसं भेटत गेली आणि मी नित्यनव्या अनुभवांनी समृद्ध होत राहिले.
- गौरी देशमुख

काहीच माहीत नसलेल्या विषयाची फक्त तोंडओळखच नाही, तर त्यात खोल बुडी मारायची. त्यातून मिळणारी माहिती व ज्ञानकण पुढच्या वाटचालीसाठी शिदोरी म्हणून उपयोगात आणायचे. स्वतःच्या मनाचा व मनाबाहेरच्या विश्वातला शोध घेण्यात आणि सतत कुठल्या ना कुठल्या अभ्यास विषयाने पछाडलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे गौरी देशमुख.

मायक्रो बायोलॉजीत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. जोडीला पॅथॉलॉजीचा एक अभ्यासक्रम. दोन वर्षे पॅथॉलॉजीही चालवली. त्वचेला होणाऱ्या काही विशिष्ट प्रकारच्या संशोधन प्रकल्पात त्या सहभागी झाल्या. रोपवाटिका व माळीकामाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी रोपवाटिकेचा काही काळ व्यवसायही केला. पिकांना उपयुक्त जिवाणूंची माहिती एका बड्या स्वयंसेवी संस्थेला शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी करून देण्याच्या संशोधन प्रकल्पात त्यांनी काम केले. या ज्ञानाचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना करून देण्यासाठी आणखी एका संस्थेबरोबर थोडे दिवस काम केले.

मोठा मुलगा शाळेत जायच्या वयाचा झाल्यावर त्याला साचेबद्ध शिक्षणपद्धतीऐवजी आनंददायी अनुभवाधारित शिक्षण कसे घेता येईल, याचा धांडोळा त्यांनी घेतला. समविचारी मंडळींच्या कृतीतून अक्षरनंदन शाळेचा पाया रचला गेला. गौरीताई संस्थापक सदस्य होत्याच, शिवाय त्यांनी उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापकपदाची जबाबदारी पेलून अनेक नवे प्रयोग साकारले. धाकटा मुलगा वर्षभर तापाने आजारी असताना डॉक्‍टरांना आजारपणाचा थांग लागेना, तेव्हा गौरीताईंनी जावेच्या मदतीने विविध संकेतस्थळं, मासिकं, पुस्तकं वाचून कारणाचा छडा लावला. उपचारांना दिशा मिळाली. त्या दरम्यान त्यांनी खादी व हातमागाची महिलांसाठीची वस्त्रं आणि नावीन्यपूर्ण पिशव्यांची निर्मिती केली.

कचरा व्यवस्थापन स्वत: केलं. त्याचबरोबर परिसरातील अनेक नागरिकांना ते पटवून दिलं. काही सोसायट्यांमध्ये व्यवस्थापनतज्ज्ञ म्हणून जबाबदारीही घेतली. काही जणांसोबत त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अ- भय’ अभियान चालवतात. पाश्‍चात्त्य स्वमदत तंत्राच्या अभ्यासक लुईस हे यांच्या साहित्यावर बेतलेला एक अभ्यासक्रम केला. त्याच प्रकारच्या इतर विचारधारांचं वाचन, मनन चालूच होतं. या समन्वयातून ‘स्वस्ति’ हा मराठीतला अभ्यासक्रम त्यांनी आखला. सात वर्षांपासून याचे काही वर्ग त्यांनी घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Constantly striving for new study