Positive News : घरगुती साहित्यातून भात झोडणी यंत्रनिर्मिती

राजेश कळंबटे
Monday, 2 November 2020

सोमेश्‍वर येथील शेतकरी माधव करमरकर यांनी बाजारातील विविध यंत्रांची पाहणी केल्यानंतर घरगुती पातळीवरच यंत्र बनविण्याचा निर्णय घेतला. तोंणदे येथील त्यांचे परशुराम गोरे आणि  कमलाकर लिमये यांची मदत घेतली. 

रत्नागिरी : मजुरांच्या तुटवड्यामुळे भातशेती खर्चिक होत आहे. अलीकडे यंत्रांचा वापर वाढला आहे. मात्र सामान्य शेतकऱ्यांसाठी यंत्रांच्या वाढत्या किमती न परवडणाऱ्या ठरतात. तालुक्यातील सोमेश्‍वर येथील शेतकरी माधव करमरकर यांनी २०१७ मध्ये पत्रा, लाकडाच्या फळ्या आणि एक एचपीची मोटर यातून कमी खर्चात घरगुती भात झोडणी यंत्र तयार केले. त्यांच्या या छोट्याशा संशोधनामुळे केवळ दोन माणसांद्वारे चार खंडी भात सहज झोडता येते. विजेच्या बिलातील किरकोळ वाढ वगळता देखभालीसाठी अन्य फारसा खर्च लागत नाही. 

भात झोडणीसाठी विविध कंपन्यांची यंत्रे बाजारात १८ हजारांपासून पुढे उपलब्ध आहेत. या यंत्राचा वापर भात काढणीनंतर वर्षातून फक्त एकदा काही काळासाठी होतो. यंत्र पुढे सहा महिने पडून राहते. सोमेश्‍वर येथील शेतकरी माधव करमरकर यांनी बाजारातील विविध यंत्रांची पाहणी केल्यानंतर घरगुती पातळीवरच यंत्र बनविण्याचा निर्णय घेतला. तोंणदे येथील त्यांचे इलेक्ट्रिशिअन परशुराम गोरे आणि सुतारकाम करणारे कमलाकर लिमये यांची मदत घेतली. 

हेही वाचा : दुग्ध व्यवसायातून पुढारले माळीसागज 

घरातील टाकाऊ पत्रा, फळ्या यांच्या साह्याने लोखंडी स्टॅण्ड तयार केले. दोन खांबांमधील अंतर दोन ते अडीच फूट ठेवले. त्या स्टॅण्डवर फळ्यांचे गोल करून बॅरलसारखे जोडले. भात झोडणीसाठी दोन गोलाच्या मध्ये बेअरिंग टाकून लाकडाचा शाफ्ट जोडला. शाफ्टला लाकडाचा चौकोनी भाग तयार करून तो जोडलेला होता. शाफ्ट फिरला की लाकडाचा चौकोनी भाग भाताच्या पेंडीवर आपटून झोडले जाईल, अशी त्याची रचना बनवली.  

गोलाकार बॅरलची एक बाजू पेंडी जाण्याएवढी मोकळी ठेवली होती. त्याला एक एचपीची मोटर बसवण्यात आली. मोटारला पुली बसवून त्याचा पट्टा झोडणी यंत्राच्या शाफ्टला जोडला. मोटर सुरू केली की शाफ्ट जोराने फिरतो आणि भात झोडले जाते. झोडलेले भात एकत्रित करण्यासाठी खालील बाजूला पत्रा जोडलेला आहे. त्यावर भात पडून ते मोकळ्या जमिनीवर गोळा होतो. पेंढीचा तूस किंवा गवताचे तुकडे शाफ्टच्या वाऱ्याने आपसूकच वेगळे होतात. थोडा खर्च करून त्याला फॅन जोडला तर यंत्राद्वारे तूस बाजूला टाकण्याची व्यवस्थाही करता येऊ शकते. हे यंत्र २०१७ मध्ये भात झोडणीपूर्वी बनवले होते. त्यातील मोटारसाठी सहा हजार रुपये खर्च आला. गेल्या चार वर्षात दुरुस्तीचा कोणताही खर्च आलेला नसल्याचे करमरकर यांनी सांगितले.

हेही वाचा : अकोले तालुक्यात डांगी गोवंशाचे संवर्धन

कसा होतो यंत्राचा फायदा
करमरकर यांनी बनविलेल्या यंत्रात एका मिनिटाला ७०० ते ८०० फटके पेंडीला बसतात. लोंबी मागेपुढे असेल तर पेंढी उलटसुलट करता येते. एकावेळी दोन पेंढीही झोडणीला लावता येते. 

घरातील एक माणूसही झोडणी सहज करतो. त्यासाठी वेगळे मजूर किंवा अधिक कौशल्याची गरज भासत नाही. त्यामुळे ३ ते ४ कामगारांवर होणारा हजार ते दोन हजार रुपयांचा खर्चही वाचतो.

या यंत्राद्वारे कमी कष्टामध्ये भात व्यवस्थित झोडले जाते. दोन तासांत तीनशे पेंढी भात झोडून होते. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एक एचपी मोटार चालवण्याइतके म्हणजे सुमारे २०० ते ३०० रुपयांइतके वीजबिल येत असल्याचे करमरकर सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Madhav Karmarkar made rice threshing machine from household materials

Tags
टॉपिकस
Topic Tags: